चिपळूण, दि. ०१ : तालुक्यातील रामपूर येथील जंगलात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या मानवी हाडांच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, हा प्रकार थरारक खुनाचा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मुंबईतील ५४ वर्षीय फ्लॅट मालकाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जंगलात जाळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या सखोल तपासानंतर मृत व्यक्तीची ओळख एजाज कुरेशी (वय ५४, रा. मालाड, मुंबई) अशी पटली. या गुन्ह्यात रामपूर येथील विशाल विजय खोडदेकर (वय २८) आणि मालाड येथील जन्नतउन्नीसा जन्नत खान (वय ३५) यांना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एजाज कुरेशी यांचा मालाड येथे असलेला फ्लॅट जन्नतउन्नीसा खान हिने चार लाख रुपयांचे डिपॉझिट भरून भाड्याने घेतला होता. काही काळानंतर भाडेकराराची मुदत संपल्यानंतर एजाज यांनी फ्लॅट खाली करून डिपॉझिटची रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र जन्नतउन्नीसाने ना फ्लॅट खाली केला ना पैसे परत दिले. यावरून दोघांमध्ये वाद वाढत गेला.
घरमालकाकडून होत असलेल्या दबावामुळे त्रस्त झाल्याचे सांगत जन्नतउन्नीसाने हा प्रकार तिच्या परिचयातील विशाल खोडदेकर याच्या कानावर घातला. त्यानंतर या प्रकरणात विशालने हस्तक्षेप केला. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जन्नतउन्नीसा राहत असलेल्या फ्लॅटमध्ये एजाज कुरेशी आणि विशाल यांच्यात जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यामध्ये एजाज गंभीर जखमी झाले. उपचाराअभावी त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेनंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासा

ठी थंड डोक्याने कट रचला. मृतदेह एका बॅगेत भरून दोघांनी मिळून तो चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे आणला. विशालच्या मालकीच्या जागेत नेऊन त्यांनी मृतदेह जाळून टाकला. या प्रकारानंतर आरोपींनी कोणताही ठसा राहू नये म्हणून घटनास्थळ सोडून दिले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामपूर परिसरातील जंगलात जळालेल्या अवस्थेत मानवी हाडे आढळून आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटवणे कठीण होते. मात्र, चिपळूण पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत हळूहळू या प्रकरणातील धागेदोरे जोडले.
पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर या संपूर्ण खुनाचा उलगडा झाला.
या घटनेमुळे चिपळूण आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ आर्थिक व्यवहारातून एवढ्या क्रूरपणे हत्या झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील पुढील तपास सुरू ठेवला असून, घटनेशी संबंधित इतर कोणते धागेदोरे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.








