गुहागर, दि. ०२ (प्रतिनिधी) : गुहागर तालुक्यातील शीर (बौद्धवाडी) येथील सुपुत्र डॉ. श्रेयश रमेश पवार यांनी B.D.S (दंतवैद्यक) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. श्रेयश पवार हे गुहागर तालुका बौद्धजन सहकारी संघ शीर शाखेचे सन्माननीय सभासद व मार्गदर्शक आयु. रमेश लक्ष्मण पवार (गुरुजी) आणि रजनी रमेश पवार यांचे सुपुत्र आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या श्रेयश यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या वडिलांचा शिक्षक म्हणून असलेला शैक्षणिक वारसा आणि आईचे पाठबळ यामुळे त्यांच्या यशाचा पाया अधिक भक्कम झाला.
या यशाबद्दल गुहागर तालुका बौद्धजन सहकारी संघ मध्यवर्ती कमिटी, मुंबई, शिक्षण कमिटी, विभाग क्रमांक ६ शीर गाव, मुंबई शाखा तसेच बौद्धजन मागासवर्गीय नागरी पतसंस्था आणि शिक्षण कमिटी मुंबई मध्यवर्तीचे सचिव संतोष अशोक पवार यांनी डॉ. श्रेयश पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. श्रेयश पवार यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजातील वंचित व शोषित घटकांसाठी करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे शीर गावासह संपूर्ण गुहागर तालुक्याचा गौरव वाढला आहे.








