गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात; ८१८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

रत्नागिरी, दि. ०४ : शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर होऊन समानता प्रस्थापित झाली पाहिजे. समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून शिक्षणाकडे पाहण्याची गरज आहे. युवकांनी नव्या तंत्रज्ञानाला धाडसाने सामोरे जात आपल्या कर्तृत्वाने देशाची अर्थव्यवस्था बळकट करावी, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ शनिवारी डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी पालकांच्या त्याग व समर्पणाबद्दल कृतज्ञता बाळगावी, तसेच महाविद्यालय हे चारित्र्य घडविण्याचे केंद्र असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, यासाठी महाविद्यालयाने किमान ६० तासांचा विशेष अभ्यासक्रम सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन होत्या. यावेळी सहसचिव श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठ गीत व महाविद्यालय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

८१८ विद्यार्थ्यांना पदवी

प्रास्ताविकात परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे यांनी मागील वर्षांच्या परीक्षेचा आढावा घेत, मार्च-एप्रिल २०२५ सत्रातील विविध शाखांतील ८१८ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात येत असल्याची माहिती दिली.

प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पदवीदान समारंभ हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत, कष्ट, जिद्द आणि चिकाटी हेच यशाचे खरे सूत्र असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांची जाणीव ठेवून जबाबदाऱ्या स्वीकारत पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी मातृ, पितृ आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता बाळगावी, तसेच आर्थिक नियोजन, शारीरिक व मानसिक आरोग्य यांना महत्त्व द्यावे, असा सल्ला दिला. जीवनातील यश-अपयश स्वीकारण्याची मानसिकता विकसित करण्याचेही त्यांनी आवाहन केले.

२८ विद्यार्थ्यांचा गौरव

समारंभात प्रातिनिधिक स्वरूपात २८ पदवीधर विद्यार्थ्यांना विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र, महाविद्यालय प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन प्राध्यापकांना पीएचडी

डॉ. स्वप्नील जोशी आणि डॉ. मंगेश भोसले यांना वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्रातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था, कुटुंबीय व मार्गदर्शिका डॉ. यास्मिन आवटे यांना दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.

आणखी वाचा