श्री. जांगलदेव नवतरुण मित्रमंडळ, मुंबई यांच्याकडून कांटे शाळेला वायरलेस प्रिंटरची भेट

रत्नागिरी, दि. ०५ : ग्रामीण भागातील शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देत जिल्हा परिषद प्राथमिक कांटे शाळेला ‘श्री जांगलदेव नवतरुण मित्रमंडळ, मुंबई’ यांच्या वतीने आधुनिक वायरलेस प्रिंटरची भेट देण्यात आली. सुमारे १६,५०० रुपये किंमतीचा Canon G3010 हा प्रिंटर शाळेला प्रदान करण्यात आला असून, या उपक्रमामुळे शाळेच्या प्रशासकीय तसेच शैक्षणिक कामांना मोठी चालना मिळणार आहे.

मुंबईस्थित या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सुविधा वाढविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, या उद्देशाने प्रिंटरची भेट देण्यात आली. या साधनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका, शैक्षणिक साहित्य, प्रकल्प, तसेच विविध कार्यालयीन कागदपत्रे तयार करणे आणि छापणे अधिक सुलभ होणार आहे.

या कार्यक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रार्थना सचिन देसाई, शिक्षक श्री. पंकज कुशिनाथ खडांगळे, विद्यार्थी तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. मारुती नारायण आग्रे, प्रशांत कुळये, प्रकाश कुळये, वसंत कुळये, सुनील आग्रे, सिद्धेश कुळये, महेश गोरुले, संदेश कुळये, सुरेश वालम (बापेरे) व इतर सदस्य उपस्थित होते.

“या प्रिंटरमुळे शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय कामे अधिक वेगाने व कार्यक्षमतेने पार पडतील. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यास ही मदत महत्त्वाची ठरेल,” असे मत मुख्याध्यापिका सौ. देसाई यांनी व्यक्त केले.

मंडळाच्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण शिक्षणाला बळ मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले. या दातृत्वपूर्ण कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यातही अशाच प्रकारचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आणखी वाचा