पुणे/मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल 92.09 टक्के लागला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. राज्यातील सर्व विभागांमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के लागला असून छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी 88.41 टक्के नोंदविण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नियमित विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 92.09 इतकी राहिली.
मुलींच्या निकालाने यंदाही आघाडी कायम ठेवली आहे. एकूण 7,22,045 मुलींमध्ये 6,85,672 मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.96 आहे. तर 8,20,427 मुलांपैकी 7,34,814 मुले उत्तीर्ण झाली असून त्यांची टक्केवारी 89.56 इतकी आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत 5.40 टक्क्यांनी अधिक राहिला आहे.
कोकण विभागाचा निकाल 97.62 टक्के लागून राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याखालोखाल कोल्हापूर विभागाचा 95.47, मुंबई विभागाचा 94.97, पुणे विभागाचा 94.24, नाशिकचा 90.53, अमरावतीचा 90.50, नागपूरचा 89.07 आणि लातूर विभागाचा 88.42 टक्के निकाल लागला आहे.
राज्यातील 10,031 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,912 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 9,042 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 91.22 टक्के लागला आहे.
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 64 विषयांची परीक्षा झाली. त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. राज्यातील 23,698 माध्यमिक शाळांपैकी 6,612 शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती मंडळाने दिली.
दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच फेरपरीक्षा आणि श्रेणीसुधार योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 या तीन परीक्षांमध्ये श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देता येणार आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 2.01 टक्क्यांनी घसरला आहे. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये राज्याचा निकाल 94.10 टक्के होता, तर यंदा तो 92.09 टक्क्यांवर आला आहे.








