आरवली, दि. ०७ : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विशेषतः संगमेश्वर तालुक्यातील देवरुख आणि आसपासच्या परिसरात पावसाचा मोठा जोर पाहायला मिळाला. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पुढील तासभर पावसाचा हा थरार कायम होता. देवरुखसह काटवली, सोनवडे, हरपुडे, कर्ली, देवघर, कीरडूवे, निवे आणि देवळे परिसरात पावसाचा जोर अधिक होता. तसेच चिपळूण तालुक्यातील नांदगाव, येगाव आणि जवळपासच्या गावांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
सध्या कोकणात आंबा आणि काजूचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच या पावसाने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. ऐन हंगामात असलेल्या आंबा पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला असून झाडांवरील तयार आंबा गळून पडला आहे. अनेक ठिकाणी फळांवर डाग पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतदार हवालदिल झाले असून सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सुद्धा याच तारखेला पावसाने अशीच हजेरी लावली होती, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगली आहे.
पावसाला सुरुवात होताच खबरदारीचा उपाय म्हणून आणि अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक गावांमध्ये वीज नसल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. वादळी वाऱ्यासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे कोकणातील शेतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.








