कोकणात अवकाळीचा तडाखा; रत्नागिरीत वादळी वाऱ्यांनी उडवली दाणादाण

रत्नागिरी, दि. ०९ : कोकणात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून शनिवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. रत्नागिरी शहरासह संगमेश्वर, खेड, हातखंबा-पाली, राजापूर परिसरात जोरदार वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला, झाडे कोसळली, घरांचे नुकसान झाले तर काही भागात वीजवाहिन्या तुटल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

रत्नागिरी शहरात सायंकाळी चारच्या सुमारास अचानक वातावरणात मोठा बदल झाला. समुद्रकिनाऱ्याकडून येणाऱ्या सुसाट वाऱ्यांसह धुळीचे प्रचंड वादळ शहरात घोंगावू लागले. काही मिनिटांतच काळे ढग दाटून आले आणि वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या बदलामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील मुख्य बाजारपेठा, समुद्रकिनारा परिसर तसेच शिवाजीनगर भागात वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक बॅनर फाटून रस्त्यावर आले. काही ठिकाणी दुकानांबाहेर लावलेले तंबू, पत्रे आणि कापडी शेड्स हवेत उडताना दिसून आले.

शनिवार असल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होती. मात्र अचानक सुरू झालेल्या वादळामुळे व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. उन्हापासून बचावासाठी लावलेले तात्पुरते कापडी आच्छादन जोरदार वाऱ्यामुळे खाली कोसळले. काही व्यापाऱ्यांचे साहित्य भिजले तर रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली.

वादळाचा सर्वाधिक फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला. शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा जवळपास एक ते दीड तास खंडित झाला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून काही भागातील वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र अनेक ग्रामीण भागांत रात्री उशिरापर्यंत अंधार कायम होता.

संगमेश्वर तालुक्यातही वादळाने मोठे नुकसान केले. वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे आणि तांत्रिक बिघाड यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. संगमेश्वर उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही निवळी आणि ३३ केव्ही आरवली या दोन्ही मुख्य वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. ठिकठिकाणी वीजवाहिन्यांचे संच तुटल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम राबवत आरवली वाहिनीतील बिघाड शोधून दुरुस्तीचे काम सुरू केले.

Oplus_16908288

खेड तालुक्यातील पोयनार परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा अधिक तीव्र होता. अनेक घरांची पडझड झाली असून काही घरांचे पत्रे उडून गेले. रस्त्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहतुकीलाही अडथळे निर्माण झाले. काही ठिकाणी वीजवाहक खांब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गावखडी परिसरात तर वादळाने धोकादायक स्वरूप धारण केले. मुसळधार पाऊस आणि प्रचंड वाऱ्यामुळे एका घरावर माडाचे झाड कोसळल्याची घटना घडली. गावखडी येथील प्रमोद सदानंद पाटील यांच्या घरावर हे झाड पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरामध्ये उपस्थित असलेले दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

समुद्रकिनारीही धुळीच्या वादळाने नागरिकांना अक्षरशः हैराण केले. समुद्रावर घोंघावणारे काळे ढग आणि वेगवान वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील वातावरण भयावह बनले होते. काही मिनिटांतच पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांनी आसरा शोधण्यासाठी धावपळ केली. किनाऱ्यावरील अनेक छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.

हातखंबा-पाली परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर अचानक काळे ढग जमा होऊन वाऱ्याचा वेग वाढला. रस्त्यांवरील धूळ, पालापाचोळा आणि कचरा हवेत उडत असल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी दृश्यमानताही कमी झाली होती. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या या शिडकाव्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

पावसानंतर परिसरातील वातावरण आल्हाददायक बनले. जंगल भागातील झाडे पावसाच्या थेंबांनी पुन्हा ताजीतवानी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुसाट वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या डोलू लागल्या तर पावसानंतर पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसरात प्रसन्नता निर्माण झाली. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी या बदललेल्या वातावरणाचा आनंद घेतला.

दरम्यान, हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. काही भागांत मोठे नुकसान झाले असले तरी या पावसामुळे उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही दिवसांतही वादळी सरी आणि अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

आणखी वाचा