रायगड, दि. १६ : मुंबई-गोवा महामार्ग वरील चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच टोलवसुली सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पनवेल ते पेण दरम्यान खारपाडा येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावरून शनिवार, १६ मेपासून वाहनधारकांकडून टोल आकारण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र महामार्गावरील अनेक महत्त्वाची कामे अजूनही अपूर्ण असल्याने “आधी रस्ता पूर्ण करा, मगच टोल घ्या,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या १४ ते १७ वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. या महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असली तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. नागोठणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेळी खिंड परिसरातील रस्त्यांची कामे, माणगाव आणि इंदापूर बायपास तसेच अनेक ठिकाणचे सर्व्हिस रोड अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अपूर्ण कामांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि अपघातांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांचा प्रवास अधिकच त्रासदायक ठरत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या अपूर्ण कामांमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत प्रशासनाने खारपाडा टोलनाका सुरू करून टोलवसुलीला सुरुवात केल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाचे अधिकृत लोकार्पण झालेले नसताना आणि कामे पूर्ण न करताच टोल आकारणी सुरू करण्यामागचे कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे. कोकणातील अनेक नागरिकांचा दैनंदिन प्रवास या महामार्गावरून होत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक वाहनांना टोलमुक्त प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी ३१ मेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम शंभर टक्के पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी कामे अद्याप सुरूच असल्याने हे आश्वासन पूर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकीकडे अपूर्ण रस्ते, वाहतूक कोंडी, धूळ आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे टोलवसुली सुरू झाल्याने कोकणवासीयांचा संताप आणखी वाढताना दिसत आहे. सामाजिक संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला असून प्रशासनाने तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.








