कोयनेच्या जंगलात अखेर ‘हिरकणी’ वाघिणीचे दर्शन

दहा दिवसांनी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; वनविभागाचा सुटकेचा श्वास

चिपळूण, दि. २० : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध ‘हिरकणी’ वाघीण अखेर कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात सुखरूप आढळून आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून वनविभागाच्या संपर्काबाहेर गेलेली ही वाघीण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. विशेष म्हणजे, हिरकणीच्या गळ्यातील जीपीएस कॉलर गायब झाल्याचेही या तपासात समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिरकणीच्या जीपीएस कॉलरचे सिग्नल एकाच ठिकाणाहून येत होते. तिच्या हालचालींचा कोणताही मागोवा लागत नसल्याने वनविभागात चिंता निर्माण झाली होती. वाघिणीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने तातडीने विशेष शोधमोहीम सुरू केली होती. जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर गस्ती पथके तैनात करण्यात आली होती.

कोयनेचे जंगल अतिशय घनदाट असल्याने शोधकार्यात अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान, जंगलात बसवण्यात आलेल्या विविध ट्रॅप कॅमेऱ्यांतील फोटो व व्हिडिओ फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये हिरकणी वाघीण सुखरूप फिरताना दिसून आली. त्यामुळे वनविभागाला मोठा दिलासा मिळाला.

वनविभागाच्या माहितीनुसार, हिरकणीची प्रकृती उत्तम असून तिचे वजनही वाढल्याचे दिसून येत आहे. ती जंगलात झाडांच्या खोडांवर मूत्रविसर्जन करून स्वतःचा परिसर निश्चित करत असल्याची नोंद अधिकाऱ्यांनी केली आहे. यावरून ती पूर्णपणे सक्रिय आणि निरोगी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, हिरकणीच्या गळ्यातील जीपीएस कॉलर सध्या दिसत नसले तरी त्याचे काही सिग्नल अद्याप अधूनमधून मिळत आहेत. वाघिणीने पंजाच्या साहाय्याने कॉलर काढून टाकले असावे किंवा जंगलातील झाडाझुडपांमध्ये अडकून ते गळून पडले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या वनविभागाचे कर्मचारी जंगलात गळून पडलेल्या कॉलरचा शोध घेत आहेत. तसेच भविष्यात हिरकणीच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी जंगल परिसरातील ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे अधिक बारकाईने निरीक्षण केले जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

हिरकणी वाघीण सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वनविभाग, वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा