रत्नागिरी, दि. २० : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे शनिवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत समुद्रात बुडालेल्या पाच पर्यटकांपैकी एका युवकाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला असून उर्वरित चौघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथून १९ जणांचा पर्यटकांचा गट गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास या गटातील काही युवक समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील लाटांचा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच जण खोल पाण्यात ओढले गेले.
समुद्रात बुडालेल्यांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश आहे. सर्वजण बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षक, ग्रामस्थ, व्यापारी तसेच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचाव व शोधमोहीम सुरू केली. शोधकार्यात प्रेम दीपक आदमाने (वय १९) याचा मृतदेह सापडला असून उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईकणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन शोधकार्यात समन्वय साधला. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रातील प्रबळ प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत असली तरी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक बोटींच्या मदतीने समुद्रात शोधमोहीम सुरू असून बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्घटनेनंतर गणपतीपुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः पावसाळ्याच्या काळात समुद्रात उतरताना पर्यटकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि जीवरक्षक व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







