रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सोमवारपासून सकाळी; सीईओ वैदेही रानडे यांचे आदेश

रत्नागिरी, दि. २० : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सोमवारपासून (दि. २२ जून) सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शनिवारी जारी केले.

आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांचे वेळापत्रक सकाळी ७ ते ११.३० असे राहणार आहे. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल झाला असला तरी त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत जाणवणाऱ्या उष्णतेचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याने शाळेची वेळ बदलण्याची मागणी पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत होती.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने या मागणीला अधिक जोर मिळाला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबतची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी दिली होती.

दरम्यान, शाळा शुक्रवारीच सकाळी सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर अधिकृत आदेश जारी होणे बाकी होते. अखेर शनिवारी परिपत्रक प्रसिद्ध झाल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळच्या वेळेत सुरू होणार आहेत.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळणार असून पालकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा