मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या चहापान कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापले. विरोधकांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सरकारवर विविध मुद्द्यांवर टीका केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
विरोधकांनी सादर केलेल्या पत्रावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांनी एकत्र येऊन पत्र दिले असले तरी त्यातील मजकूर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून तयार केल्याचे दिसते. जनतेच्या खऱ्या प्रश्नांपेक्षा केवळ आरोप करण्यावर विरोधकांचा भर असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटींची कर्जमाफी
राज्यातील शेतकरी संकटावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही कर्जमाफी राजकीय हेतूने नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा सुमारे ८० टक्के कमी पाऊस झाल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. कोकणात २३ जूननंतर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते, असे त्यांनी सांगितले. १०० मिमी पाऊस होईपर्यंत पेरणी करू नये, असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार
लाडकी बहीण योजनेतून ८१ लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, अनेक संधी देऊनही ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत, त्यांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. मात्र पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा लाभ नियमितपणे मिळत असून योजना सुरूच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारचा वेग विकासाकडे – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कधीही हात आखडता घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा असल्याचे नमूद केले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सरकारने ३०० हून अधिक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा शिंदे यांनी केला. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र, सर्वसामान्यांसाठी घरे, ग्रामीण भागातील साडेतीन हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या अनेक विकासकामांचा त्यांनी उल्लेख केला. महाविकास आघाडी सरकारचा पाय ‘ब्रेक’वर होता, तर सध्याच्या सरकारचा पाय ‘ॲक्सिलरेटर’वर असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘ऑपरेशन टायगर’वर मोठ्या घडामोडींचे संकेत
राज्यात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भातही एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले. “मी जे ऑपरेशन करतो ते फुलप्रूफ करतो. लवकरच याबाबत मोठी बातमी मिळेल,” असे ते म्हणाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरेंनाही टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या राजकीय भाष्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांच्याविषयीचे एक मीम पाहिले. त्यात ते म्हणतात, ‘मला छान झोप लागते, माझ्यासोबत एकही आमदार किंवा खासदार नाही,’” असे सांगत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्न, पावसाची स्थिती, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, विकासकामे तसेच राज्यातील विविध घडामोडींवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.








