गुहागर, दि. २३ (उत्तम पवार) : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या गुहागर तालुका शाखेतर्फे गुरुवारी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र सरकारकडे संबंधित घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, शांततापूर्ण आंदोलन करणे आणि आपले मत व्यक्त करणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. अशा परिस्थितीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा आणणारे असून देशाच्या भवितव्याशी निगडित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर दडपशाहीऐवजी संवादाच्या माध्यमातून तोडगा काढणे आवश्यक आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जंतर-मंतर येथील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय उपचार व नुकसानभरपाई द्यावी आणि भविष्यात शांततापूर्ण आंदोलनांवर अशा प्रकारची कारवाई होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी गुहागर तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, उपाध्यक्ष शरद जाधव, महासचिव सुनील जाधव, सचिव विशाल सावंत, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक मुजावर, महेंद्र कदम, शशिकांत सुर्वे, राजेश पवार, भूषण पवार, बीएसपीचे तालुकाध्यक्ष उमेश पवार, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र मोहिते, मुस्लिम समाज अध्यक्ष साबीरभाई साल्हे, उद्योजक शोएब मालाणी, पत्रकार उत्तम पवार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







