MPSC औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीचा आरोप; रोहित पवारांनी सादर केले कथित पुरावे, CBI चौकशीची मागणी

१२ लाखांत प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय; एमपीएससी, एफडीए आणि संबंधित अकादमीवर गंभीर आरोप

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत २२ मार्च २०२६ रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर, गट-ब) भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कथित व्हॉट्सअॅप चॅट, प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट आणि इतर कागदपत्रे सादर करत या प्रकरणाची CBIमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.

रोहित पवार यांनी सांगितले की, २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे ४४ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केला होता. परीक्षा २२ मार्च २०२६ रोजी घेण्यात आली. त्यानंतर १२ जून रोजी निकाल जाहीर झाला आणि २२ जुलै रोजी ५०६ उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

पत्रकार परिषदेत पवार यांनी दावा केला की, परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २० मार्च रोजीच काही उमेदवारांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिकेची PDF आणि उत्तरे व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आली होती. संबंधित प्रश्नसंचातील सुमारे ९० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या कथित पेपरफुटीसाठी १२ लाख रुपयांत प्रश्नपत्रिका विकण्यात आल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी नंदुरबारमधील एका अकादमीवर गंभीर आरोप केले.

रोहित पवार यांनी या प्रकरणात ‘बार्शी कनेक्शन’ असल्याचाही दावा केला. एका नायब तहसीलदाराच्या मुलाने १३वा, तर मुलीने १६वा क्रमांक मिळवल्याचा उल्लेख करत, गुणवत्ता यादीतील काही निकाल संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कट-ऑफपेक्षा कमी गुण मिळालेल्या काही उमेदवारांनाही मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या मते, संबंधित पेपरफुटीमध्ये परीक्षा केंद्राशी किंवा एमपीएससीमधील काही अधिकाऱ्यांशी संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांनी यापूर्वी एमपीएससी, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांकडे तक्रारी दिल्या होत्या, मात्र त्यावर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

या प्रकरणात तातडीने एफआयआर दाखल करावा, व्हायरल स्क्रीनशॉटचे फॉरेन्सिक परीक्षण करावे, संशयितांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि व्हॉट्सअॅप चॅट तपासावेत तसेच आवश्यक असल्यास CBIमार्फत चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत अंतिम निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचीही त्यांनी मागणी केली.

दरम्यान, एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी यापूर्वी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगत पेपरफुटीचे आरोप फेटाळले होते. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही आयोगाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात एकीकडे गंभीर आरोप करण्यात आले असले, तरी आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून चौकशीअंतीच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. विद्यार्थी संघटनांनीही या संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा