नवी मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी): मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांसाठी कोकणातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून, २७ ते ३१ जुलै या कालावधीत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी २७ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’, तर मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ ते ३१ जुलै या चार दिवसांत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ कायम राहणार आहे. या कालावधीत कोणत्याही जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आलेला नाही. तरीही समुद्रकिनारी जाणे टाळावे, नदीकाठच्या भागात सतर्क राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोकणात सरासरीच्या ६४.८२ टक्के पावसाची नोंद
महावेधच्या २७ जुलै २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, कोकण विभागात आतापर्यंत १,७१५.८१ मि.मी. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ६४.८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १,३२९.०६ मि.मी. होता. त्यामुळे यंदा कोकणात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हानिहाय पर्जन्यमानात रायगडमध्ये २,०१२.८० मि.मी., रत्नागिरीत १,७५९.९० मि.मी., सिंधुदुर्गमध्ये १,२८०.५० मि.मी., ठाण्यात १,६६९.१० मि.मी., पालघरमध्ये १,७९२.५० मि.मी., तर मुंबई उपनगरात १,८९५.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर
सततच्या पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची इशारा पातळी ५.०० मीटर असताना पाणीपातळी ५.२० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. धोका पातळी ७.०० मीटर असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
इतर सर्व नद्या नियंत्रणात
ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रमुख नद्यांची पाणीपातळी सध्या इशारा पातळीखाली आहे. ठाण्यातील उल्हास, काळू, भातसा, पालघरमधील सूर्या, वैतरणा, पिंजाळ, रायगडमधील कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा, तसेच रत्नागिरीतील वशिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी, कोदवली आणि सिंधुदुर्गमधील तिलारी, तेरेखोल, कर्ली, गडनदी व वाघोटन या सर्व नद्या सध्या सुरक्षित पातळीखाली वाहत आहेत.
कोकण विभागातील २७ प्रमुख नद्यांपैकी केवळ जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून उर्वरित २६ नद्या नियंत्रणात आहेत. मात्र, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






