दिघी-पोलादपूर-वाई ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव; विकास की नव्या वादाची ठिणगी?

सागरी महामार्ग, काटेतळी रस्ता आणि आंबेनळी घाटाचा समावेश; मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी

पोलादपूर, दि. २७ (प्रतिनिधी): रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या दिघी बंदर–पोलादपूर–महाबळेश्वर–वाई (सुरूर) ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पुढे आणला असून, या प्रस्तावामुळे विकासाच्या अपेक्षांबरोबरच स्थानिकांमध्ये विविध प्रश्नही उपस्थित होत आहेत. सुमारे १४० किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित महामार्गाद्वारे कोकणातील दिघी बंदराला पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडण्याची योजना आहे.

प्रस्तावित महामार्गामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक पट्टा मुंबई-बंगळुरू महामार्गाद्वारे दिघी बंदराशी जोडला जाईल. मालवाहतुकीस गती मिळेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि पर्यटनास चालना मिळेल, असा दावा केला जात आहे. डोंगराळ भूप्रदेश लक्षात घेऊन या मार्गावर भुयारी बोगदे आणि मोठे पूल उभारण्याचाही विचार आहे. आठ पदरी महामार्गासाठी थेट भूसंपादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, लवकरच विस्तृत प्रकल्प अहवालासाठी (DPR) निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

मात्र, या प्रस्तावावर स्थानिक नागरिकांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गेल्या दीड दशकांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना अनेक ठिकाणी बायपास, सेवा रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्या कायम आहेत. पावसाळ्यात महामार्गावरील खराब स्थितीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

स्थानिकांचे म्हणणे आहे की, आधी विद्यमान मुंबई-गोवा महामार्ग पूर्णपणे सुरक्षित आणि दर्जेदार करण्यात यावा. त्यानंतरच नव्या ग्रीनफिल्ड महामार्गाची अंमलबजावणी करावी. अपूर्ण प्रकल्प असताना नव्या घोषणांमुळे नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या प्रस्तावित मार्गात दिघी बंदर, पोलादपूर, काटेतळी, करंजाडी रेल्वे स्थानक परिसर, आंबेनळी घाट आणि वाई-सुरूर या मार्गांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पूर्वीच्या सागरी महामार्गाच्या काही भागाचा वापर करून हा मार्ग विकसित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पोलादपूर येथील कार्यक्रमात काटेतळी-करंजाडी रेल्वे स्थानक रस्त्याचे भूमिपूजन केले होते. तसेच, अलीकडेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची मागणी केली होती. त्याआधी मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही यासंदर्भात पाठपुरावा केल्याची माहिती आहे.

दरम्यान, प्रस्तावित महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन होण्याची शक्यता असल्याने शेतजमिनी आणि घरांवर परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तसेच, सातत्याने दरडी कोसळणाऱ्या आंबेनळी घाटाचा या प्रकल्पात समावेश असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ग्रीनफिल्ड महामार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण, उद्योग व पर्यटनाला दीर्घकालीन चालना मिळण्याची शक्यता असली, तरी त्याआधी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणे आणि स्थानिकांच्या शंकांचे समाधान करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

आणखी वाचा