
मुंबई, दि. २७ : राज्य सरकार हे वीरपत्नी, वीरमाता आणि वीरसैनिकांच्या परिवारासोबत राज्य सैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून सदैव ठामपणे उभे असून, त्यांच्या सन्मान व कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.
कारगिल विजय दिनानिमित्त महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील लोकभवन येथे आयोजित वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा महान वारसा लाभला आहे. देशसेवा आणि कर्तव्यपालनासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. कारगिल युद्धातही राज्यातील अनेक जवानांनी शौर्य, त्याग आणि बलिदानाचे अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या बलिदानामुळेच देशाची सीमा सुरक्षित राहिली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.”
या प्रसंगी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरसैनिकांचा विशेष सन्मान करून त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, व्हाइस अॅडमिरल संजय वात्सम, लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांच्यासह वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.






