मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; १२ तास गणेशभक्त रस्त्यावरच!

माणगाव, इंदापूरसह अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा; गणरायाची मूर्ती घेऊन जाणारे वाहनही सात तास अडकले

रायगड, दि. १२ : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. माणगाव, इंदापूरसह महामार्गावरील अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही प्रवासी तब्बल १२ तासांपासून वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. तासन्‌तास वाहने जागच्या जागी उभी राहिल्याने गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्गाचे रखडलेले काम आणि वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी खासगी वाहने आणि एसटी बसने कोकणाकडे रवाना झाले. सुरुवातीला यंदाचा प्रवास गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तुलनेने जलद होत असल्याचे चित्र दिसून आले. मात्र, शनिवारी रात्रीपासून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महामार्गावरील वाहतूक संथ झाली. माणगाव, इंदापूरसह अनेक ठिकाणी वाहनांची अक्षरशः कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे, अरुंद रस्ते, वाढलेली वाहनसंख्या आणि काही ठिकाणी बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. नागोठणे आणि कोलाड येथील फ्लायओव्हरवरील रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्याचप्रमाणे इंदापूर आणि माणगाव बायपासची कामेही अपूर्ण असल्याने जुन्या दुपदरी मार्गावर वाहनांचा ताण वाढत आहे. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या वाढताच कोंडी निर्माण होत आहे.

गणरायालाही वाहतूक कोंडीचा फटका

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका थेट गणरायालाही बसला आहे. रायगडमधील पेण येथून दापोलीकडे गणेशमूर्ती घेऊन निघालेले वाहन कोंडीत अडकले. पेण ते माणगाव हे साधारण दीड तासात पूर्ण होणारे अंतर पार करण्यासाठी तब्बल सात तासांचा कालावधी लागला. त्यामुळे गणेशभक्तांसह मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, या परिस्थितीमुळे एका संतप्त प्रवाशाने रायगडमधील राजकीय नेतृत्वावरही नाराजी व्यक्त केली. महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनीही या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. वाकण-पाली-कांदळगाव-निजामपूर-माणगाव तसेच ढालघर फाटा, माणगाव बायपास आणि रायगड रोडमार्गे महाड असे पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. मात्र, शुक्रवार आणि शनिवारी या पर्यायी मार्गांवर तुलनेने तुरळक वाहतूक दिसून आली. त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पोलिसांना आवश्यकतेनुसार वाहने पर्यायी मार्गांवर वळवावी लागणार आहेत.

पोलादपूर परिसरातही गणेशभक्तांना प्रवासी सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सडवली फाटा परिसरातील टपऱ्या, उपहारगृहे तसेच शौचालय आणि स्नानगृहांचा वापर प्रवाशांना करावा लागत आहे. महाड तालुक्यातील गांधारपाले आणि पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील प्रवासी सुविधा केंद्रांची माहिती देणारे पुरेसे दिशादर्शक फलक नसल्याने या सुविधांचा अपेक्षित लाभ प्रवाशांना मिळत नसल्याची तक्रार आहे.

रविवार-सोमवारी महामार्गाची खरी परीक्षा

शनिवार संध्याकाळपर्यंत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा खासगी वाहनांमधून कोकणाकडे जाणारा प्रवास काही प्रमाणात जलद झाल्याचे दिसून आले. मात्र, शनिवार रात्रीपासून रविवार आणि सोमवारदरम्यान मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतून हजारो वाहने आणि एसटी बसेस कोकणाकडे रवाना होणार असल्याने महामार्गाच्या वाहतूक व्यवस्थेची खरी परीक्षा होणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही परिस्थिती फारशी वेगळी नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण करण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेचे दीर्घकालीन नियोजन करून गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, जलद आणि सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल आता कोकणवासीय आणि संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा