‘मी मराठवाड्याची लेक; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’ : सुनेत्रा पवार

नांदेडसह परभणी जिल्ह्यात पिकांची पाहणी; बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या

नांदेड/परभणी, दि. २६ सप्टेंबर : पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातील काही भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील विविध भागांना भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी बांधावर संवाद साधत त्यांनी पिकांची स्थिती, पावसाअभावी झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी जाणून घेतल्या. “मी मराठवाड्याची लेक आहे. या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मला समजतात. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील बारूळ फाटा, सोनखेड येथे सुनेत्रा पवार यांनी शेतकरी संदीप रामराव जायभाय यांच्या शेताला भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. ९ जुलै रोजी लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची सद्यस्थिती, पिकाची वाढ, उत्पादनाची संभाव्यता तसेच पावसाअभावी झालेल्या परिणामांची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजांबाबत माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, जनावरांचा चारा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही शासनासाठी तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचीही सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध भागांना भेटी देत पिकांची स्थिती जाणून घेतली. सर्वप्रथम गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथे त्यांनी शेतशिवाराची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, संभाव्य उत्पादन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

शेतशिवारातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या असून, आवश्यक मदत व उपाययोजनांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. प्रशासनानेही परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी असून, परिस्थितीनुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा दिलासाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

आणखी वाचा