शेगाव, दि. २७ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना जाहीर करण्यात आला आहे. २५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत विविध पुरस्कारांची घोषणा केली.
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दरवर्षी परिषदेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन पत्रकारांचा गौरव केला जातो. जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश बाळ जोशी, मधुकर भावे आणि रामभाऊ जोशी यांच्यासह मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.
यंदा आचार्य प्र. के. अत्रे पत्रकारिता पुरस्कार संपादक प्रशांत कदम यांना जाहीर झाला आहे. याशिवाय यावर्षीपासून हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबुराव पराडकर यांच्या नावाने हिंदी पत्रकारांसाठी पुरस्कार सुरू करण्यात आला असून, पहिला पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी यांना जाहीर झाला आहे.
परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेले अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार – सचिन परब, नागोजीराव उर्फ अण्णासाहेब दुधगावकर स्मृती पुरस्कार – अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार – अविनाश महालक्ष्मे, स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार – संतोष आंधळे, स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख देवडीकर कृषी पत्रकारिता पुरस्कार – सुनील पाटील (कोल्हापूर), ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार – महेश तिवारी (गडचिरोली), सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार – जान्हवी मुळे (दिल्ली) आणि संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार – ‘ग्रामोद्धार’ दैनिकाचे संपादक बापुसाहेब जाधव (सातारा) यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे एस. एम. देशमुख यांनी सांगितले.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष शिवराज काटकर, विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष अनिल उंबरकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष रणजीत रजपूत आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावर्षीपासून ‘लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक कार्य पुरस्कार’ देण्यात येणार असून, त्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.








