रत्नागिरी, दि. १० : सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यंदाच्या २०२६ सालच्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली आहे. विविध क्षेत्रांतील आठ मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून, १३ डिसेंबर रोजी एका शानदार कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोणतेही अर्ज न मागवता संबंधितांच्या कार्याची माहिती घेऊन पुरस्कारांची निवड केली जाते, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
यंदा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आर्ना रूपम पाटणे (खेड), धन्वंतरी पुरस्कार डॉ. संतोष वामन बेडेकर (रत्नागिरी), आदर्श पौरोहित्य पुरस्कार श्रीकृष्ण सीताराम काजरेकर (कुडाळ), आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार माधुरी रामचंद्र कुलकर्णी (रायपाटण), कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. मोहन बुवा कुबेर (नागपूर), कृषी संजीवन पुरस्कार नितीन रविंद्रनाथ करकरे (संगमेश्वर), उद्योजक पुरस्कार योगेंद्र प्रभाकर हळबे आणि आदित्य प्रदीप तांबे (कान्हे, चिपळूण), तर उद्योगिनी पुरस्कार शुभदा महेश पाध्ये (कुर्धे-मेर्वी) यांना जाहीर झाला आहे.
क्रीडा क्षेत्रातील आर्ना पाटणेचा गौरव
खेड येथील ज्ञानदीप विद्यामंदिरची विद्यार्थिनी आर्ना रूपम पाटणे हिची राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एका शैक्षणिक वर्षात तिची राष्ट्रीय स्तरावरील नेटबॉल आणि राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धांसाठी निवड झाली. धुळे, भंडारा आणि गोंदिया येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशामागे क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. लहान वयातच क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या यशाची दखल संघाने घेतली आहे.
चार दशकांची वैद्यकीय सेवा
रत्नागिरीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष वामन बेडेकर यांना धन्वंतरी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि बालरोगशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. गेली ४० वर्षे ते रत्नागिरीत वैद्यकीय सेवा देत आहेत. असंख्य बालरुग्णांवर उपचार करून त्यांच्या वेदना कमी करण्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम त्यांनी केले आहे.
वैद्यकीय सेवेसोबतच वृत्तपत्रीय लेखन, आकाशवाणीवरील मुलाखती आणि वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष, जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे सक्रिय सदस्य, लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि निरीक्षणगृह बालगृह संस्थेचे मानद सचिव अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. त्यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक योगदानाचा या पुरस्कारातून गौरव होणार आहे.
आदर्श शिक्षक माधुरी कुलकर्णी
रायपाटण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षिका माधुरी रामचंद्र कुलकर्णी यांना आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी त्यांनी साटवली क्रमांक १, कारवली क्रमांक १, रायपाटण क्रमांक १, नेवरे-ढोकमळे आणि पाचल क्रमांक ५ या शाळांमध्ये अध्यापन केले आहे.
गणित विषयाचे प्रभावी अध्यापन आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. परसबाग, विद्यार्थी भांडार, बागकाम आणि पाढे पाठांतर यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
पौरोहित्य आणि कीर्तनसेवेचा सन्मान
कुडाळ येथील श्रीकृष्ण सीताराम काजरेकर यांना आदर्श पौरोहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शालेय शिक्षणात शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर त्यांनी पुणे येथे नवाथे गुरुजींकडे अष्टक संहितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर गोव्यातील पैंगीण येथील वेदमूर्ती रामचंद्र टेंगशे यांच्याकडे पुढील शिक्षण पूर्ण केले. विठ्ठल शास्त्री बोरकर यांच्याकडे ज्योतिष आणि याज्ञिकीचे शिक्षण घेतले. याज्ञिकीच्या निमित्ताने त्यांनी २५ वर्षे गोव्यात सेवा केली असून, गेली २० वर्षे घोटगे येथे पौरोहित्य करत आहेत. रांगोळी आणि नाटकातील अभिनयाची आवडही त्यांनी जपली आहे.
नागपूर येथील ह. भ. प. मोहन बुवा कुबेर यांना कीर्तनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी संस्कृत विषयात एम.ए., बी.एड., संगीत विशारद आणि हिंदी कोविद अशी शैक्षणिक पात्रता मिळवली आहे. धरमपेठ शिक्षण संस्थेतून उपप्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या कुबेर यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून कीर्तनसेवा सुरू केली. गेली सुमारे ६० वर्षे ते कीर्तनसेवेत असून, आजवर २४ हजारांहून अधिक कीर्तने केली आहेत. विविध कीर्तन परंपरांचा अभ्यास आणि सादरीकरण करणाऱ्या कुबेर यांना विविध धार्मिक संस्थांकडून सन्मान प्राप्त झाले आहेत. कीर्तन महाविद्यालयाच्या स्थापनेत तसेच अखिल भारतीय कीर्तन संमेलनाच्या आयोजनातही त्यांचे योगदान आहे.
शेती आणि ग्रामीण पर्यटनातून नवी दिशा
संगमेश्वर येथील नितीन रविंद्रनाथ करकरे यांना कृषी संजीवन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी १९८६ ते २००६ या काळात दूरचित्रवाणी क्षेत्रात स्वतंत्र चित्रपट संकलक म्हणून काम केले. विविध मालिका, जाहिराती आणि माहितीपटांच्या संकलनाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कोकणातील तुरळ गावात ग्रामीण जीवनाशी जोडलेला उपक्रम सुरू केला.
२००४ मध्ये ‘मामाच्या गावाला जाऊया’ या संकल्पनेतून शिबिरांना सुरुवात केली. २०११ मध्ये ठाणे सोडून गावी स्थायिक झाल्यानंतर त्यांनी मातीतील कॉटेजेस उभारून निवासाची सुविधा सुरू केली आणि बंद पडलेली शेती पुन्हा सुरू केली. भाताच्या विविध जाती, हळद, आंबेहळद, कुळीथ, पावटे, भाज्या, कलिंगड, आंबा, कोकम आणि फणस यांचे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनांपासून लोणची, पिठे, पापड, मोरंबे आणि सरबतांची निर्मितीही केली जाते. ‘शेतातून ताटात’ या संकल्पनेतून पर्यटकांना स्थानिक शेतीमालापासून तयार केलेले पदार्थ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन
कुर्धे-मेर्वी येथील शुभदा महेश पाध्ये यांना उद्योगिनी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी २००१ मध्ये नाटे येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. २००७ पासून कुर्धे येथे यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काजूगर, विविध स्वादांचे काजू आणि काजू बी प्रक्रिया करण्याचे काम सुरू केले. याशिवाय विविध स्वादांचे केळीचे वेफर्स, कोकण प्रॉडक्टची लोणची आणि सरबतांची निर्मिती त्या करतात. रत्नागिरीतील विविध प्रदर्शनांत सहभाग घेण्याबरोबरच ऑनलाइन माध्यमातूनही त्यांच्या उत्पादनांना मागणी मिळते.
नारळावर आधारित उद्योगाची उभारणी
चिपळूण तालुक्यातील कान्हे येथील कोकोऑर्गेनिक कोकोनट इंडस्ट्रीजचे संस्थापक योगेंद्र प्रभाकर हळबे आणि आदित्य प्रदीप तांबे यांना उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. योगेंद्र हळबे यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयातील पदवी आणि कॉयर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. आदित्य तांबे यांनी जैवतंत्रज्ञानातील पदवी, पर्यावरणशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आणि कॉयर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे.
या उद्योगात २०२० पासून कोकोपीट आणि पायपुसणी तयार केली जाते. २०२४ पासून नारळाच्या करवंटीपासून विविध उपयुक्त आणि शोभिवंत वस्तू बनवण्यास सुरुवात झाली. कोकणात राहून स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योग उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रांत आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या आठ पुरस्कारार्थींचा १३ डिसेंबर रोजी सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कार उपक्रमामागील उद्देश आहे.








