संगमेश्वर, दि. १२ (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील तुरळ-शिंदे आंबेरी परिसरातील प्रवाशांना गेल्या २ वर्षांपासून पिकअप शेड अभावी त्रास सहन करावा लागत आहे. तुरळ स्टॉप तर नेहमी गजबजलेला असतो तरीही तिथे मार्ग निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उन्हामध्ये ताटकळत उभं राहून बसची वाट पाहावी लागते. अशा प्रकारे प्रवाशांना ऊन, पाऊस यांचा सामना करावा लागतो आहे.
महामार्ग रुंदीकरणाला सुरुवात झाल्यापासून प्रवासी मार्ग निवाऱ्याचा प्रश्न कायम असून, प्रवाशांचे जीवन धोक्यात आले आहे. शिंदे आंबेरी येथील नागरिकांनी स्व खर्चातून तात्पुरती शेड उभारली आहे.परंतु एका बाजूला अजून कोणतीच व्यवस्था नाही.तुरळ येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेडची व्यवस्था नाही त्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची सोय करण्यासाठी महामार्ग प्रशासनाने त्वरित पिकअप शेड बांधावीअशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.