जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत नूतन विद्या मंदिर, ओणी, राजापूर मुलांच्या संघाने ३२ वर्षानंतर विजेतेपद पटकावले

डेरवण (चिपळूण), दि. १८ : एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत नूतन विद्या मंदिर, ओणी, राजापूर मुलांच्या संघाने ३२ वर्षानंतर विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात शिर्के प्रशाला, रत्नागिरी संघाने कायम राखले.

एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे बुधवारपासून जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी १४ वर्षाखालील वयोगटाच्या स्पर्धा संपन्न झाली. सर्व ९ तालुक्यातील मुले व मुली असे १८ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

मुलांचा अंतिम सामना नूतन विद्या मंदिर, ओणी, राजापूर विरुद्ध जि. प. शाळा, फणसवणे, संगमेश्वर असा झाला. ओणी, राजापूर संघाने जि. प. शाळा, फणसवणे संघाचा १ डाव १ गुण असा एकतर्फी पराभव करीत तब्बल ३२ वर्षांनी जिल्हा शालेय स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. ओणी संघाकडून कार्तिक सावंत, मयूर मासये आणि पियुष सुर्वे यांनी अष्टपैलू खेळ केला.

मुलींच्या गटात शिर्के प्रशाला, रत्नागिरी संघाने ज. ग. पेडणेकर विद्यालय, तळवडे, लांजा संघावर १ आदि आणि ४.३० मिनिटे राखून विजय संपादन केला. शिर्के प्रशालेकडून श्रावणी सनगरे, स्वरांजली कार्लेकर आणि अस्मी कार्लेकर यांनी भक्कम बचाव करीत विजयात मोलाचा वाट उचलला. तळवडे संघाकडून कस्तुरी मेस्त्री, आणि जानव्ही गुरव यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

आणखी वाचा