गुहागर, दि. १७ : वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर आज (१७ नोव्हेंबर) दुपारी तालुक्यातील नरवण येथील सावली हॉटेलबाहेर प्राणघातक हल्ला झाला. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच प्रचाराच्या धामधुमीत ही घटना घडल्याने गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
विकास जाधव हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. सर्वच पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत रंगले असतानाच आज दुपारी घडलेल्या या घटनेने चर्चेला एकच उधाण आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेतली असून हा हल्ला कोणी केला, नेमका कोणत्या प्रकरणातून झाला याचा शोध गुहागर पोलीस घेत आहेत. जिल्ह्यात सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आहे.
हल्ला झाला त्यावेळी जाधव यांच्यासमवेत पत्नी होती. त्यांना तात्काळ गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी धाव घेऊन याबद्दल माहिती घेतली. हल्लेखोरांचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, या घटनेने उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आता आहे. या घटनेचा गुहागर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी निषेध केला असून गुहागरमध्ये आमच्या समाजबांधवांवर अशा घटना घडू लागल्या तर आम्हालाही शस्त्र हाती घ्यावी लागतील, असा इशारा सावंत यांनी दिला.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गुहागर पोलिसांना दिले आहेत.
अण्णा जाधवांचा स्टंट ?
वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने अण्णा जाधव हे नाराज असल्याचे येथील कार्यकर्ते सांगतात. वंचित चे अधिकृत उमेदवारचा प्रचार न करता महायुतीचे उमेदवाराचा प्रचार करत आहेत असे आरोप वंचितच कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान आजची घटना हि राजकीय स्टंटबाजी असल्याचे स्थानिक येथील नागरिक सांगतात. नक्की प्रकरण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी गुहागर पोलीस करत आहेत.








