राजापूरात किरणोदय!

राजापूर, दि. २३ (प्रतिनिधी): अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात शिवसेना विरूध्द शिवसेना यांच्यामध्ये झालेल्या लढतीत शिंदे  सेनेचे उमेदवार किरण सामंत यांनी मागील तीन टर्म आमदार असलेल्या राजन साळवी यांचा सुमारे १९ हजार ६८० मताधिक्याने दणदणीत पराभव करत विधानसभेत दमदार एन्ट्री केली आहे. पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेले किरण सामंत अखेरच्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिले. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदार संघात मशालीला धक्का देत धनुष्यबाणाने अचूक निशाना साधला आहे.
शिक्षण.. आरोग्य… रोजगार… या मूलभूत प्रलंबीत सुविधांसह   मतदार संघाचा मागील पंधरा वर्षांतील रखडलेला विकास त्या पार्श्वभुमीवर राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी अखेर संधी मिळताच भाकरी परतवलीच. आणि राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातुन महायुतीचे उमेदवार किरण सामंत १९ हजार ६८०    मतांनी दणदणीत विजयी झाले.  या निवडणूक महाविकास आघाडीला आव्हान देत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे कॉँग्रेसचे बंडखोर जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांचा बार फुसका ठरला.. तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या अन्य उमेदवारांना सुध्दा मोठे अपयश पदरात पडले. काही अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाली.राजापूर विधानसभा मतदार संघात विकासाच्या आशेचा किरणोदय झाला. राजापूर विधानसभा मतदार संघाला पंधरा वर्षांनंतर नवीन आमदार किरण सामंत यांच्या रूपात मिळाला.राजापूर विधानसभा मतदार संघात किरणपर्व सुरु झाले आहे.
  दि.२० नोव्हेंबर रोजी झालेल्या राजापूर विधानसभा मतदार संघातील मतदानाची मतमोजणी शनिवारी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राजापूर तालुक्यातील हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात पार पडली. प्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये राजन साळवी यांना ७४८तर किरण सामंत यांना ६९७ मते मिळाली. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतमोजणीला सुरूवात झाली. अंतिम निकालाअंती महायुतीचे किरण सामंत यांना ८० हजार २५६ मते, महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना ६० हजार ५७९मते, अपक्ष उमेदवार अविनाश लाड ७ हजार ९४५मते, संदीप जाधव १हजार ६५ मते, अमृत तांबडे १ हजार २०९मते, यशवंत हर्याण २८६मते, राजेंद्र साळवी १ हजार ७४मते, संजय यादवराव ३७२ मते तर १ हजार ८३०  मतदारांनी नोटाला पसंती दिली.
मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत किरण सामंत यांनी ८३१ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पुढील प्रत्येक फेरीमध्ये सामंत यांचे मताधिक्य वाढत राहिले.  सामंत यांचे मताधिक्य वाढत राहिल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. तर उध्दव सेनेच्या  गोटात भयाण शांतता पसरली होती. नवव्या फेरीतच सामंत यांनी दहा हजाराहून अधिक मताधिक्याचा टप्पा गाठला.
सलग सतराव्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीत सामंत यांनी आघाडी घेतली होती. मात्र सतराव्या फेरीत साळवी यांना अवघ्या ६९मतांची आघाडी मिळाली. तर २१ व्या फेरीत साळवी यांना ६८३ मतांची नाममात्र आघाडी घेता आली. हा अपवाद वगळता सामंत यांनी प्रत्येक फेरीत आपली आघाडी कायम राखली आणि दणदणीत विजय संपादन केला.महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांचे मताधिक्य वाढू लागल्यानंतर शिवसेनेच्या गोटात उत्साह संचारला. जसजसे मताधिक्य वाढत होते, तसतसा मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या शिवसैनिकांचा जल्लोश सुरू होता.  फटाके फुटत होते. गुलालाची उधळण सुरु होती. उत्स्फूर्तपणे विजयाच्या घोषणा सुरु होत्या.
शनिवारी सकाळपासूनच मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्ते ठाण मांडून होते. जसजशी मतमोजणी पार पडत होती तसतशी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी असलेल्या मंडपांत शांतता पसरत होती, तर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. शेवटी किरण सामंत विजयी झाल्याचे समजताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत तसेच ढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. किरण सामंत मतमोजणी कक्षातून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत एकच जल्लोश केला. त्यानंतर हातिवले येथून सजविलेल्या गाडीतून राजापूर शहरापर्यंत जल्लोशात मिरवणुकही काढण्यात आली. राजापूर जवाहर चौकात तर विजयाचा जोरदार जल्लोष साजरा केला गेला.
  राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघांचे विजयी उमेदवार आणि नूतन आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची विजयी प्रतिक्रीया… हा विजय मतदारांचा असून या विधानसभा मतदार संघातील रखडलेला विकास कामे मार्गी लावणे यालाच मी प्राधान्य देत आहे. अशी विजयी प्रतिक्रिया राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघाचे  नवनिर्वाचित आमदार श्री किरण सामंत यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. या मतदारसंघाचे अनेक ज्वलंत प्रश्न असून ते सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे सांगताना मिळालेला विजय समस्त मतदारांचा आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या विजयाचे सारे श्रेय मतदारांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिले.

आणखी वाचा