देवरुख (संगमेश्वर), दि. ०३ (प्रतिनिधी): दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत सामाजिक अभिसरण व संस्थात्मक बांधणी या घटकात देवरुख नगरपंचायती मार्फत प्रेरणा शहर स्तर संघाची सन २०२२ मध्ये स्थापना झालेली आहे. सदर संघामार्फत सोनचैरीया शहर उपजिविका केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून अभियानातील लाभार्थ्यांना उपजीविकेच्या / रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, गटांच्या उत्पादनांना मार्केट उपलब्ध करून देणे, नविन गटांची स्थापना, प्रशिक्षण व बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध प्रकारच्या ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत.
यामध्ये शहर स्तर संघ कार्यकारिणी समिती सदस्यांनी प्रभावीपणे काम करावे या उद्देशाने वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार व प्रशासक तथा मुख्याधिकारी देवरुख नगरपंचायत, श्री. चेतन विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५/११/२०२४ रोजी प्रेरणा शहर स्तर संघाचा अभ्यासदौरा सावंतवाडी येथील सुंदरवाडी शहरस्तर संघाचे कामकाज पाहण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. सदर अभ्यास दौऱ्यासाठी देवरुख नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. चेतन विसपुते यांनी उपस्थित महिलांना अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले व गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.
या दौऱ्यामध्ये सावंतवाडी येथील सुंदरवाडी शहरस्तर संघाचे कार्यालयीन कामकाज, संघामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा, गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेली रणनिती त्याचबरोबर संघाचे उत्पादन वाढीसाठी करण्यात येत असलेले नियोजन इत्यादी बाबत महिलांनी सखोल माहिती घेतली. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक श्री.एकनाथ पाटील व संघाच्या उपाध्यक्षा सौ. मनिषा बांदेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अभ्यास दौऱ्यामध्ये प्रेरणा शहर स्तर संघाची कार्यकारिणी समिती सदस्य, संघाच्या व्यवस्थापिका तसेच समुदाय संसाधन व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी देवरुख नगरपंचायतीचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.कुमार सरवदे यांनी परिश्रम घेतले व अभ्यास दौरा यशस्वी केला.