देवरुख, दि.०६ : कोणत्याही शहरातील ग्रामीण लोकवस्तीमध्ये व चिंचोळया, अरुंद मार्गाचे ठिकाणी, गल्लीबोळात आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाची गाडी पोहचू शकत नाही. यामुळे जीवित व वित्त हानी मोठया प्रमाणावर होत असते. यावर उपाय शोधण्यासाठी यंत्रणेकडून अनेक प्रयत्न झाले, मात्र त्याला यश आले नव्हते. आता मात्र त्यावर अत्याधुनिक उपाय शोधण्यात आला आहे आणि तो म्हणजे फायर बुलेटचा वापर. याकरीताच देवरुख नगरपंचायतकडे एक फायर बुलेट प्राप्त झाली आहे.
फायर बुलेटवरुन अग्नीशमन दलाचे दोन कर्मचारी प्रवास करु शकतात. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी तात्काळ पोचून आग विझवण्याचे काम सुरु केले जाऊ शकते. अग्नीशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, त्यामध्ये जलदता आणणे, कमी खर्चामध्ये व कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तात्काळ पोहचविण्यासाठीची ही यंत्रणा फायर बुलेटच्या स्वरुपात कार्यरत असणार आहे. आग लागल्यानंतर तात्काळ ती विझवली तर आगीची परिणामकारकता वाढत नाही. आग मोठी असेल तर अग्निशमन दलाची गाडी त्यांच्या पाठोपाठ घटनास्थळी दाखल होईल.
रॉयल्ड एनफिल्ड 350 सीसीची बुलेट मॉडिफाईड करण्यात आली आहे. यामध्ये ९ लिटर क्षमतेचे दोन फोम सिलेंडर बसवण्यात आले आहेत, पंपाचा प्रेशर ३.५ हॉर्स पॉवरचा असेल. या फायर बुलेटवर देवरुख नगरपंचायतीचे श्री. लिंगप्पा बसाण्णा हळमणी मो. क्र. 9405874851 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.