गाव खेड्यातील सुशिक्षित तरुण नोकरीसाठी बाहेर का जातात?

भारत एक बलशाली, बलाढ्य, व्यापक संस्कृती व ऐतिहासिक वारसा असलेला विकसनशील देश आहे. ज्या देशाला जगभरात एक वेगळी ओळख आहे. लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव असलेल्या जगाच्या पाठीवरचा एक महत्त्वपूर्ण राष्ट्र म्हणजे भारत; या देशाच्या इतिहासाकडे पाहिले असता आपल्याला दिसून येते ते म्हणजे समृद्ध जीवन पद्धतीचे पुरावे यांना आपण मोहन जोदारो किंवा हडप्पा संस्कृतीच्या अवशेष रूपामध्ये ओळखतो. देशाचे सौंदर्य आणि देशांमध्ये असलेली श्रीमंती यालाच भाळून इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले. या 150 वर्षात जे जे लुटता आलं ते ते लुटण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला आणि देशाच्या तरुणांच्या व देशवासीयांच्या प्रयत्नातून या देशांमध्ये स्वातंत्र्याचा सूर्योदय 15 ऑगस्ट 1947 साली झाला सूर्योदय झाला; पण देशामध्ये अंधकारमय वातावरण होतं ते म्हणजे दारिद्र्यतेचे हिंसेचे आणि भुकेने व्याकूळ असलेल्या गरीब भारतीय जनतेचे. स्वकीयांच राज्य निर्माण झालं पण आता खरी गरज होती ती देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचण्याची त्याकरता राज्यघटनेची निर्मिती झाली. देश घटनेचे आकलन करू लागला आणि देशांमध्ये प्रगतीची लाट प्रस्थापित झाली. 1950 ते 1965 पर्यंत औद्योगीकरणाची सुरुवात भारतामध्ये झाली आणि तेथून खऱ्या अर्थाने देशाला एक वेगळ्या व्यवसाय क्षेत्राकडे घेऊन जाण्यात आलं. इतिहासामध्ये 12 बलुतेदार त्याचबरोबर शेती व्यवसाय व नोकरी अशा पद्धतीची अर्थव्यवस्थेची रचना पहावयाला मिळत होती त्या रचनेला फाटे फुटले ते भारतातील औद्योगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात या काळात हिंदुस्थान शिपयार्ड, हिंदुस्थान टूल्स, इंटिग्रल कोच फॅक्टरी आधी व्यावसायिक उद्योजकांची पायाभरणी झाली व औद्योगीकरणाला चालना मिळाली अशाच प्रकारचे छोटे उद्योग सुरू झाले व देशातील तरुण पारंपारिक शेती व्यवसायाला बगल देत या  उद्योगांच्या चाकोरी बद्द जीवन पद्धतीचे अधीन होत गेले आणि मग देश हळूहळू कृषीप्रधान तिकडून नोकरी प्रधान तिकडे वळला हे बदल केव्हा व कसे घडले हे कळलेच नाही. आज ही समस्या देशभर सर्वत्र जाणवत आहे कारण पोट भरण्यासाठी अन्न हवे आहे पण ते पिकवण्यासाठी कोणीही शेती करू इच्छित नाही; हे आजचे भयंकर वास्तव आहे. 1965 नंतर अनेक टप्प्यांमध्ये 2011 पर्यंत आणि अगदी आ 20२४ पर्यंत व्यावसायिक क्षेत्रांमध्ये झालेली भयंकर वाढ या सगळ्यात एक मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि तिचे प्रस्थ हळूहळू वाढत आहे आणि ती समस्या म्हणजेच स्थलांतर.
भारतामध्ये होणारे स्थलांतर हे अनेक कारणास्तव होते, त्यामध्ये व्यवसाय, शिक्षण, आरोग्य याकरता झालेले स्थलांतर हे मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यापैकी सर्वात मोठ्या संख्येने स्थलांतर म्हणून व्यावसायिक स्थलांतराकडे पाहिले जाते. देश एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहचला आणि शेतीला बगल देणारे तरुण आज शेतीकडे पाठ फिरून उभे आहेत. या स्थलांतरामुळे आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे शहरांमध्ये वाढलेली भरमसाठ लोकसंख्या, अस्वच्छतेमुळे नवनवीन निर्माण झालेले रोग आणि त्या फॅक्टरीच्या चिमण्यातून निघणारा काळा धूर आमच्या देशवासीयांच्या आयुष्यात काळोख पसरवत आहे.  अंधारामध्ये हरवून गेलेला माणूस जगण्याचा खरा अर्थ विसरला आहे जणू;  जीवनाचे रंग प्रदूषणाने गिळंकृत करून इंद्रधनुला देखील काळच बनवला आहे. आज मुंबई, दिल्ली, कलकत्ता, नागपूर, बेंगळुरू यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कचऱ्यासारखी माणसं आणि माणसांसारखा कचरा ही परिस्थिती भयभीत करणारी ठरते आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत आणि जगाच्या पाठीवरील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी ही आपल्या भारतात आहे हे आपलं दुर्दैव आहे. आजच्या तरुणांना आपल्या पारंपारिक व्यवसायाकडे वळायची जराही इच्छा नाही, शेती करून छोटी मोठी कामे करून गावांमध्ये आपलं वास्तव्य करायला आजची तरुणाई लाजते; पण मोठ मोठ्या ऑफिसमध्ये साहेबांची चाकरी करायला आमची आजची तरुणाई पुढे सरसावलेली दिसून येते.  हुर्र सर्जा म्हणायला लाजणारी तरुणाई मोठ्या दिमाकात यस सर- यस मॅडम, ओके सर – ओके मॅडम करायला पुढे सरसावते.  स्वतःच्या बैलांना, वासरांना चरवण्यासाठी स्वच्छंद निसर्गात जगायला धजावत नाही पण किड्या-मुंग्यांसारखे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर कानात हेडफोन टाकून रेल्वेची वाट पाहता संतासोबत राहिला त्यांना स्वर्गीय सुख मिळत. जगाचा पोशिंदा होण्याचे सौख्य सोडून चकरी करण्यामध्ये धन्यता मानणारी आजची पिढी देशाला एका वेगळ्या वळणावर घेऊन जात आहे. आज आम्ही कौशल्यपूर्ण भारताच्या निर्मितीची स्वप्न पाहतो पण कौशल्याला स्वतःच्या देशासाठी वापरणारे काहीच खरे देशभक्त देशामध्ये आहेत बाकी सर्व देशवासीयच आहेत पण त्यांना देशभक्ती अजून शिकायचे आहे.
        ओसाड पडलेल्या गावांकडे पाहून; गावाच्या दयनीय अवस्थेचे वाईट वाटते. एकेकाळी गजबजलेली ही गाव ज्या गावच्या घराघरांमध्ये शिक्षणाची स्वप्न पाहिली गेली ते शिक्षण गावाचं गाव पण हिरावून नेईल याची कल्पना देखील कोणी केली नसेल, पण वास्तवामध्ये तेच झाले. पोरं शाळेत जायला लागलं की त्याची शेती बंद होते आणि दहावी पास झालं की मनातल्या मनात त्याचा साहेब बनतो ही वस्तुस्थिती आहे. उच्चशिक्षित होऊन कौशल्याचा वापर जरूर करावा वाटल्यास त्यासाठी आपले घरदार गाव, तालुका, जिल्हा, राज्य सोडून जावे लागले तरी चालेल पण उच्चशिक्षित आणि सुशिक्षित या मधला फरक आम्ही लक्षात घेत नाही. दहावी आणि बारावी करून सपनो की नगरिया मुंबईकडे जाण्याचे वेद आमच्या तरुणांना लागतात बोटावर मोजण्या इतकेच यशस्वी होतात बाकी सगळे पृथ्वीचा भार म्हणून एक दिवस नष्ट होतात. आजच्या तरुणांच्या या वागण्यामुळे होणाऱ्या परिणामांमध्ये अनेक विचारांनीच भयभीत व्हावे असे परिणाम आहेत. गावाच्या गाव ओसाड पडली, शेत माळरान उध्वस्त झाली, देवळे भकास झाली; चीटपाखरू ही नसावे अशी भयावह परिस्थिती गावागावांमध्ये निर्माण झाली. गावांमध्ये राहायला कोणी नाही मग सरकारी योजना कोणासाठी, सरकारचा पैसा कोणासाठी असे म्हणत गावा गावाचे विकास खुंटले, कधीकाळी डांबराचे पक्के रस्ते बनवले होते आज पुन्हा नुसत्या पाऊलवाटात शिल्लक आहेत. काही गावांमध्ये म्हातारी- कोतारी माणसं आहेत, जायला यायला रस्ते नाहीत, आरोग्याची सोय नाही, पाणी नाही, वीज नाही आणि हे मिळवुन देणारा गावाला गावपण निर्माण करणारा तरुणही गावांमध्ये नाही. प्रकल्पांच्या फायली येतात आणि परत निघून जातात कारण विकास योजनांचा पाठपुरावा करणारे खंबीर हात शहरातल्या ऑफिसमध्ये फायलींचे गट्टे उचलतात आणि त्यामुळे आमच्या गावांचा विकास खुंटलेला दिसून येतो आणि याला कारणीभूत आहे ते म्हणजेच स्थलांतरित तरुण.  चकाचंद दुनियेमध्ये आमची गावाबद्दलची सहानुभूती हरवत चाललेली आहे आणि म्हणूनच श्रीमंताचा गरीब देश म्हणून भारताला एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे.
 देशाला बलशाली राष्ट्र म्हणून उदयास आणावयाचे असेल तर मानव संसाधनाने देशातील प्रत्येक भागात काम करणे गरजेचे आहे; मग ते खेडे असो, वाडी असो पाडा असो वा मोठी शहरे असो; गरजेनुसार प्रत्येक भागात काम करावे नाहीतर श्वास घ्यायला जागा नसलेली मुंबई आणि ओसाड पडलेली खेडी असे वास्तव आपल्यासमोर निर्माण होईल आणि त्या वेळेला देश वासी म्हणून आपण काहीच करू शकणार नाही.
भयभीत करणारी परिस्थिती निर्माण झाली की त्यावर काहीतरी उपाय होतो हे आपण जाणतो हा आपला इतिहास आहे. त्याच पद्धतीने जर खेड्या खेड्यात उद्योगधंदे झाले लोकसंख्येनुसार सरकारी प्रकल्पांना गावागावांमध्ये उत्पादनाची संधी दिली तर गावातील तरुण वर्ग शहराकडून पुन्हा गावांमध्ये येईल, पुन्हा गावे सुजलम-सुफलम होतील, सरकारी योजना राबवून गावांचे कायापालट होईल. देशासमोर असणाऱ्या अनेक समस्या नष्ट होतील; गरज आहे ती फक्त गावांमध्ये रोजगार निर्माण करण्याची व तरुणांच्या मनात गावामध्ये असलेल्या वैभवशाली संपन्नतेची जाणीव करून देण्याची.  छोट्या छोट्या उद्योगातून एक चांगल्या पद्धतीचं अर्थशास्त्र निर्माण होऊ शकतं त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असलेल्या संपदेला जपून त्यातून व्यवसायिक तयार झाले तर हा देश आणि त्याची अर्थशास्त्रीय संकलपना बदलायला वेळ लागणार नाही आणि ज्या दिवशी देशांमध्ये ही क्रांती होईल त्या दिवशी स्थलांतरातून निर्माण होणाऱ्या समस्या संपुष्टात येतील. खरं सांगायचं झालं तर स्थलांतरच संपुष्टात येईल आणि स्थलांतर एक समस्या हा प्रश्नच उद्भवणार नाही धन्यावाद!
– श्री. प्रांजल शशिकांत मोहिते.  (MBA HR, BA, DTed)
मुख्याध्यापक, द कडवई इंग्लिश स्कूल

आणखी वाचा