“सहकार सप्ताहानिमित्त रत्नागिरीत कार्यशाळा; सहकार ‘QR’ क्रांतीची झलक”

रत्नागिरी, दि. ३ (प्रतिनिधी): केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर १ जुलै ते ६ जुलै २०२५ या कालावधीत देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये लेखापरीक्षण, संचालक मंडळ कार्यप्रणाली, वार्षिक सर्वसाधारण सभा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या महत्त्वपूर्ण बाबींवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्री. विनोद अंड्रस्कर व श्री. महेश जाधव यांनी आदर्श लेखापरीक्षणाचे महत्व विशद करताना लेखापरीक्षणात घ्यावयाच्या दक्षतेवर भर दिला.
डॉ. सोपान शिंदे (जिल्हा उपनिबंधक) यांनी वार्षिक सभा व संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली.
अॅड. दीपक पटवर्धन (अध्यक्ष, स्वामी स्वरूपानंद पतसंस्था) यांनी सभाशास्त्र, इतिवृत्तलेखन या विषयांवर विचार मांडले.
डॉ. सुधीर गिम्हवणेकर (सरव्यवस्थापक, रा.जि.म.स. बँक) यांनी डिजिटल परिवर्तन आणि सहकार क्षेत्रातील टेक्नॉलॉजीचा वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे आणखी एक आकर्षण ठरले ते म्हणजे “सहकार सोपान” या QR कोड ग्रंथालयाचे वाटप, ज्याच्या माध्यमातून सहकार विषयक माहिती स्मार्टफोनद्वारे सहज उपलब्ध होते. या अभिनव उपक्रमाची कल्पना डॉ. सोपान शिंदे यांची असून, काही दिवसांपूर्वीच याचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री यांच्या हस्ते झाले आहे.
कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, संचालक गजानन पाटील, उपसरव्यवस्थापक संदीप तांबेकर, व्यवस्थापक मोहन बापट आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सोमेश्वर विकास संस्थेच्या सभासदांना आंबा पिक कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले.
या उपक्रमाला जिल्ह्यातील ७० संस्थांचे ९२ प्रतिनिधी उपस्थित होते.
रत्नागिरीतील सहकारी संस्थांनी घेतलेली ही सकारात्मक पुढाकार व भविष्यवेधी उपक्रम सहकार चळवळीच्या नव्या दिशेचा प्रारंभ मानला जात आहे.

आणखी वाचा