दापोली, दि. ४ : कोकणातील एका लेकीने आपल्या स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठत अमेरिकत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व सर्वश्रेष्ठ असणाऱ्या “दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर 2025” या किताबाला गवसनी घातली आहे. हा सर्वोच्च सन्मान मिळवणारी ती प्रथम महाराष्ट्रीयन आहे.
रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातील शमा बुटाला व लग्नानंतरच्या सौ. शमा केसकर यांनी हा भिम पराकम करुन दाखविला आहे. शमा केसकर या सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मात्र त्यांची नाळ आजही कोकणाशी जोडली गेली आहे. त्यांचे कुटुंब हे मुंबई अंबरनाथ येथे वास्तव्यास असून त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण हे मुंबई यूनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. त्यानंतर तिने अमेरिकेत मास्टर्स इन कम्यूनिकेशन ही पदवी संपादन केली. अमेरिकेत तिने विविध टेक कंपनीत वरीष्ठ पदावर काम करुन नावलौकीक मिळवला व स्वतःला सिद्ध केले. त्या सध्या अमेरिकेत स्टेल्थ एआय स्टार्टअप कंपनीत मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेने घेत सौ. शमा केसकर यांना यंदाचा दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इयर 2025 हा किताब देवून सन्मानित केले आहे. त्यांच्या या यशाबाबत त्यांचेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.