श्रवण-वाचा दोष असणाऱ्यांसाठी ‘आस्था’ची आशादायी शिबीरसेवा!

रत्नागिरी, दि. २२ : दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या आस्था सोशल फाउंडेशन व मुंबई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवण व वाचा दोष असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी विशेष मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन २० जुलै रोजी करण्यात आले. रत्नागिरीतील शिवाजीनगर येथे “आस्था थेरपी सेंटर” येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भरवण्यात आलेल्या या शिबिरास २९ नागरिकांनी थेट लाभ घेतला.
या शिबिरात जन्मतः किंवा जन्मानंतर श्रवणदोष असलेले, अस्पष्ट बोलणारे, बोलताना अडचण जाणवणारे बालक तसेच मोठ्या वयोगटातील व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये कान, नाक, घसा रोगतज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे-सातवसे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. या दोघांनी बालकांच्या व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करत, समस्येवर योग्य तो उपाय सुचवला.
प्राजक्ता भोगटे-सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने OAE, BERA, PTA या श्रवण चाचण्या ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर करण्यात आल्या. या तपासण्यांद्वारे श्रवण क्षमतेची अचूक चाचणी घेण्यात आली. डॉ. कश्मिरा चव्हाण यांनी अनेक लाभार्थ्यांची कान, नाक, घसा या संदर्भातील मोफत वैद्यकीय तपासणी केली तसेच गरजूंना मोफत औषधाही वितरित केले.
विशेष म्हणजे, या शिबिरात चार दिव्यांग लाभार्थ्यांना श्रवण यंत्र मोफत प्रदान करण्यात आले. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात श्रवण क्षमता सुधारण्यास मदत होणार आहे. शिबिरात स्पीच थेरपिस्ट श्री संकेत चाळके व तांत्रिक सहाय्यक श्री कल्पेश साखरकर यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
शिबिराचे आयोजन अतिशय नियोजनबद्धरीत्या करण्यात आले होते. आस्था संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत सामाजिक बांधिलकी जपली. रत्नागिरी परिसरातील श्रवण व वाचा दोष असलेल्या व्यक्तींसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे. अशा वैद्यकीय उपक्रमांनी समाजातील दिव्यांगांसाठी नवी आशा निर्माण केली असून, याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले.

 

श्रवण व वाचा दोष शिबिरात तपासणी करताना, कान नाक घसा तज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण, ऑडिओलॉजिस्ट श्रीम.प्राजक्ता भोगटे,सातवसे, स्पीच थेरपीस्ट श्री.संकेत चाळके

आणखी वाचा