“संस्थेचा विश्वासार्हतेकडून प्रगतीकडे प्रवास” – अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांचे स्पष्ट दिशादर्शन

लांजा, दि. २७ (राहुल आग्रे): कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, लांजा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी लांजा येथील कुळकर्णी–काळे छात्रालयात उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या सभेला २५० हून अधिक सभासद उपस्थित होते, ज्यामुळे संस्थेतील सभासदांचा सहभाग आणि निष्ठा प्रकर्षाने जाणवली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत परवडी होते. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत, भविष्यातील दिशादर्शन स्पष्टपणे मांडले.
“कुणबी विकास सहकारी पतसंस्था ही सभासदांच्या विश्वासावर उभी असून, प्रामाणिक कारभार, पारदर्शक व्यवस्था आणि संघशक्तीच्या बळावर संस्थेने उंच भरारी घेतली आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी आगामी योजनांची माहिती दिली.
त्यांच्या मते, संस्थेच्या डिजिटल सेवा अधिक सुलभ करणे, शाखा विस्तार, नव्या आर्थिक योजना राबवणे, तसेच तरुणांचा आर्थिक सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद, शाखांचे व्यवस्थापक, तसेच पिग्मी आणि रिकरिंग एजंट यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री. मधुकर पालये यांनी यावेळी स्वतः लिहिलेले, पतसंस्थेच्या प्रवासाचे प्रतिबिंब असलेले गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप डाफळे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. शेवटी उपाध्यक्ष श्री. विलास दरडे यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
संस्थेच्या सातत्यपूर्ण आर्थिक प्रगतीचा आलेख, सभासदांचा सक्रीय सहभाग आणि नेतृत्वाची स्पष्ट दिशा या त्रिसूत्रीमुळे सभा यशस्वी झाली. सभेनंतर सभासदांमध्ये नवचैतन्य, विश्वास आणि भविष्याबाबत सकारात्मकता दिसून आली. कुणबी विकास सहकारी पतसंस्था ही आता केवळ आर्थिक मदत करणारी संस्था नसून, ग्रामीण अर्थविश्वात प्रगतीचा दीप उजळणारी विश्वासाची ज्योत बनली आहे.

आणखी वाचा