#kayy_samajleev : ‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’ मध्ये प्रथमेश पवार यांचा डंका; तिहेरी सन्मान

रत्नागिरी, दि. ०६ (प्रतिनिधी): ‘काय समाजलीव’ प्रस्तुत ‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’मध्ये नवोदित कलाकार प्रथमेश पवार यांनी आपल्या प्रभावी अभिनय, कसून छायांकन आणि एकूण कलात्मकतेच्या जोरावर स्पर्धेत तिहेरी यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्कृष्ट छायांकन हे तीन प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
हा गौरव समारंभ ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरीच्या टी.आर.पी. येथील अंबर हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रथमेश पवार यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेला हा बहुमान जिल्ह्यातील डिजिटल माध्यमात सक्रिय असलेल्या नवोदित कलाकारांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
स्पर्धेतील एकूण १३० हून अधिक रील्सपैकी प्रथमेश पवार यांच्या टीमने सादर केलेल्या रीलमध्ये असलेल्या प्रभावी कथानक, सशक्त अभिनय आणि तांत्रिक सफाईमुळे ती स्पर्धेच्या निर्णायकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या विविध कलाकृतींमध्ये पवार यांच्या रीलने कलात्मकतेचा सर्वोच्च मापदंड ठरवत मोठी दखल घेतली.
या गौरवाबाबत प्रतिक्रिया देताना प्रथमेश पवार म्हणाले, “या स्पर्धेत आमच्या रीलला द्वितीय क्रमांक मिळाला ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या परिश्रमाचे फळ आहे. अनेक अडचणींवर मात करत आम्ही ही कलाकृती साकारली. ‘काय समाजलीव’चे आणि रत्नागिरीकर प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.”
स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास रत्नागिरीतील अनेक डिजिटल क्रिएटर्स, कलावंत, रसिक प्रेक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पातळीवरील स्पर्धेमुळे नव्या प्रतिभांना व्यासपीठ मिळाले असून, सोशल मीडियाच्या नव्या युगात ग्रामीण कलाकारही राष्ट्रीय व्यासपीठावर झळकू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून प्रथमेश पवार यांच्या कामगिरीकडे पाहिले जात आहे.

https://www.instagram.com/kayy_samajleev?igsh=d2p2NnJ3emk1a2Jq

आणखी वाचा