PRASHANT YADAV : प्रशांत यादव भाजपमध्ये दाखल ; कोकणात भाजपला नव्या नेतृत्वाची ताकद

श्री प्रशांत यादव यांच्या पत्नी, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचे पक्षात स्वागत करताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण. (छायाचित्र- अनिल फाळके (दैनिक रत्नभूमी प्रेस फोटोग्राफर, मुंबई -चिपळूण))
मुंबई, दि . १९ (अंकुश कदम) : कोकणातील राजकारणाला वेगळी दिशा देणारी घटना आज मुंबईत घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस, उद्योजक व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन
तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदारपदाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते प्रवेश सोहळा
प्रशांत यादव यांचा पक्षप्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रवेश सोहळ्यात यादव यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. स्वप्ना यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण आणि शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे भाजपला चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात मोठा राजकीय बळकटीचा हात मिळाला आहे.
चिपळूण-संगमेश्वरातील राजकारणात सक्रिय वाटचाल
खेर्डी गावचे सरपंच म्हणून राजकीय वाटचाल सुरू केलेल्या प्रशांत यादव यांनी कमी कालावधीत मतदारसंघात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या विरोधात लढा दिला होता. तेव्हा यादव यांनी तब्बल 90 हजार मते मिळवून भक्कम ताकद दाखवली होती. केवळ 6 हजार 800 मतांनी त्यांचा पराभव झाला. हीच निवडणूक त्यांची जिल्ह्यातील नेतृत्वशक्ती अधोरेखित करणारी ठरली.
वाशिष्ठी डेअरी आणि उद्योजकतेतून जनाधार
दापोली तालुक्यातील वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन म्हणून प्रशांत यादव यांनी शेतकरी व दुग्धव्यवसायिकांसाठी महत्त्वाचे काम उभारले आहे. डेअरीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संपर्क निर्माण झाला आहे. हा जनाधार राजकीय पातळीवर देखील त्यांना बळ देणारा ठरला आहे.
कार्यकर्त्यांचा ताफा आणि देवीचे आशीर्वाद
आज सकाळी चिपळूणहून निघालेल्या पक्षप्रवेश यात्रेला उत्साहाचे वातावरण होते. शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांनी मुंबईचा मार्ग धरला. प्रवासाची सुरुवात वालोपे गावच्या ग्रामदेवता श्री झोलाई देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली. नव्या राजकीय प्रवासासाठी देवीचे आशीर्वाद घेतल्यावर हा ताफा मुंबईकडे रवाना झाला.
नितेश राणे यांची पूर्वघोषणा
काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी वाशिष्ठी डेअरीला भेट देऊन आयोजित पत्रकार परिषदेत प्रशांत यादव यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे आजचा प्रवेश सोहळा ही केवळ औपचारिकता ठरली. मात्र, कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यादव यांचे वक्तव्य
“मी विकास कामांना गती मिळावी, कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला नवे नेतृत्व मिळावे या उद्देशाने भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाच्या माध्यमातून कोकणात विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे प्रशांत यादव यांनी प्रवेश सोहळ्यात सांगितले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रवेश
रत्नागिरी जिल्ह्यात नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे भाजप नेत्यांनी वारंवार नमूद केले होते. यादव यांच्या प्रवेशाने भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतच नव्हे तर विधानसभा लढतीतही बळकटी मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी तसेच कोकणातील भाजपसाठी नवे पर्व ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
छायाचित्र- अनिल फाळके (दैनिक रत्नभूमी प्रेस फोटोग्राफर, मुंबई -चिपळूण)

आणखी वाचा