रत्नागिरी, दि. १९ (जिमाका) : अनु.जाती व नवबौध्द घटकातील व्यक्तींना त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने रमाई आवास घरकुल योजना सुरू केली आहे. अर्जाचा नमुना जिल्ह्यातील सर्व नगरपालिका / नगरपंचायतीमध्ये उपलब्ध असून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने दोन प्रतीमध्ये अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे विहीत नमुन्यात सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव दूरध्वनी क्रमांक : 02352-230957 (श्री.अमोल पाटील मो.नं.9673411275) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
अनु.जाती व नवबौध्द घटकातील व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारचे घर बांधणे शक्य होत नाही. तसेच शहरामधील वाढत्या किंमतीमुळे तेथे स्वतःचे घर घेवू शकत नाही. शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने रमाई आवास घरकुल योजना सुरू केली आहे.
योजनेचे स्वरूप :
नगरपरिषद / नगर पालिका / नगरपंचायत क्षेत्रातील अनु.जाती व नवबौध्द घटकातील व्यक्तींना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल. घराची मर्यादा किंमत : 2 लाख 50हजार, घराचे क्षेत्रफळ : 269 चौ.फु.(30 चौ.मी.)
पात्रता :
लाभार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकातील असावा, लाभार्थ्याचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे,वार्षिक उत्पन्न मर्यादा नगरपालिका क्षेत्र 3.00 लाख, शक्यतो लाभार्थ्याची स्वत:ची जागा असावी अथवा स्वत:चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधण्यात येईल. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल.शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे :
रेशन कार्ड / निवडणूक मतदान ओळखपत्र / विद्युत देयक, जमीन ताबा पत्र पुरावा (7/12 उतारा / मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र.) स्थलदर्शक नकाशा, सहहिस्सेदाराचे संमत्तीपत्र. यापुर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र,सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला.








