मुंबई, दि. ३० : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ पोस्ट करत त्याने आपल्या चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या रहाणेला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठीही संधी न मिळाल्याने त्याने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईचा ३८ वर्षीय रहाणे २०११ मध्ये भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने वनडे आणि २०१३ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश करत भारतीय संघातील सर्वात विश्वासार्ह मधल्या फळीतील फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. परदेशी खेळपट्ट्यांवरील दमदार खेळी आणि संयमी फलंदाजीमुळे त्याने अनेक संस्मरणीय विजयांमध्ये मोलाची भूमिका बजावली. त्याने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.
रहाणेची खरी ओळख कसोटी क्रिकेटमधील यशस्वी फलंदाज म्हणून राहिली. त्याने ८५ कसोटी सामन्यांत ५,०७७ धावा करत १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ९० सामन्यांत २,९६२ धावा करत तीन शतके आणि २४ अर्धशतके केली, तर २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३७५ धावा केल्या.
रहाणेची कारकीर्द केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर कर्णधार म्हणूनही उल्लेखनीय ठरली. त्याने भारताचे सहा कसोटी सामन्यांत नेतृत्व केले. त्यापैकी चार सामने भारताने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित राहिले. विशेष म्हणजे, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकही कसोटी सामना गमावला नाही. २०२०-२१ मध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने ऑस्ट्रेलियात भारतीय संघाचे नेतृत्व करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. अॅडलेडमधील पराभवानंतर मेलबर्न कसोटीत त्याने झळकावलेले शतक आणि त्यानंतर मालिकेत मिळवलेला विजय भारतीय क्रिकेटच्या सुवर्णक्षणांपैकी एक मानला जातो.
निवृत्तीची घोषणा करताना रहाणे भावूक झाला. आपल्या व्हिडिओ संदेशात तो म्हणाला, “प्रत्येक प्रवासाला सुरुवात आणि शेवट असतो. आता पुढे जाण्याची योग्य वेळ आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असलो तरी क्रिकेटशी माझे नाते कायम राहील. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता.”
शांत स्वभाव, संघभावना, संकटसमयी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि परदेशातील संस्मरणीय खेळी यामुळे अजिंक्य रहाणे भारतीय क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून कायम स्मरणात राहील. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचा समारोप झाला आहे.








