अयोध्येत दिवाळी ! पण या ‘हिंदुहितरक्षकां’ची दखल कोण घेणार ?

 प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मभूमी वरुन गेल्या काही वर्षांपासून भारतातील वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे.  ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येची मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यात यावी, असा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयातील 5 सदस्यीय घटनापीठाने एकमताने हा निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण, न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांनी हा निर्णय दिला.  २२ जानेवारी २०२४ रोजी अतिप्रचंड उत्साही वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत प्रभू रामल्लाच्या मूर्तीची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. देशात जानेवारी महिन्यात, पौष मासात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीने हा सोहोळा आपल्याच पक्षाचा केला असल्याचे आणि त्याचा पुरेपूर राजकीय फायदा भारतीय जनता पक्ष उठवीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. वास्तविक चैत्र शुद्ध नवमी रोजी रामनवमी या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, अशा भावना हिंदु बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन २२ जानेवारी २०२४ चा मुहूर्त मुक्रर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.  ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचा ढाॅंचा असंख्य कारसेवकांनी उद्ध्वस्त करुन रामजन्मभूमि मंदिराचा पाया रचला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांना त्या दिवशी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की बाबरी मशीद उद्ध्वस्त कुणी केली. तेंव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून सरळ सरळ हात वर केले आणि “नहीं, वह बीजेपी के नहीं थे, आर एस एस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हिएचपी के नहीं थे,” असे उद्गार सुंदरसिंह भंडारी यांनी काढले. फिर वह कौन थे ? असा पुढचा प्रश्न येताच त्यांनी,”शायद शिवसेना के होंगे”, असे सांगितले. तेंव्हा एकाच वाघाने डरकाळी फोडली ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे. जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे, अभिमान आहे, असे बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांनी यावर आधारित एक दिनदर्शिका प्रकाशित केली, परंतु त्यावर बंदी घालण्यात आली. राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत रामल्लाच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. नरसिंह राव यांच्या कारकिर्दीत बाबरी धराशायी झाली. आताचे छत्रपती संभाजीनगर आणि तेंव्हाचे औरंगाबादचे माजी महापौर, शिवसेनेचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्यासह हजारो शिवसैनिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक कारसेवकांनी अयोध्या गाठून कामगिरी फत्ते केली होती. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सुद्धा पोहोचले होते. राम रथयात्रेचे मुख्य सूत्रधार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, विनय कटियार आदी असंख्य महानुभाव तिथे होते. बाबरीवर पोहोचणारे कुणाच्या नियंत्रणात नव्हते. नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की यांना रोखा तेंव्हा ये सुननेवाले नहीं, रुकनेवाले नहीं, वे मराठी मे बोल रहे हैं, असे ऐकू येत होते. प्रमोद महाजन यांना गळ घालण्यात आली. यावेळी अयोध्येत ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक, छायाचित्रकार मोहन बने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी याचि देही याचि डोळा संपूर्ण घटनाक्रम टिपला. उदय तानपाठक यांनी चक्षुर्वैसत्यम वृत्तान्त दिला. मोहन बने यांनी संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात टिपली. अयोध्येचा खटला २०१९ पर्यंत चालला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील दैनिक सामना मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून सुमारे पंचवीस वर्षे सेवा बजावणारे संजय दत्तात्रय डहाळे यांना लखनौ येथे न्यायालयात सीबीआयने पाचारण केले. सीबीआयचे अधिकारी संजय डहाळे कार्यवाह असलेल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या चोगले हायस्कूल मध्ये समन्स बजावण्यासाठी येऊन पोहोचले. एका दिवसात लखनौ येथे पोहोचणे शक्य नाही हे स्पष्ट करुन संजय डहाळे यांनी सीबीआयला सहकार्य केले. अंबरनाथ येथील ज्येष्ठ पत्रकार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित म्हात्रे हे सुद्धा ६ डिसेंबर  १९९२ रोजी अयोध्येत कारसेवेसाठी पोहोचले होते. मी त्यांना निष्ठावंत कारसेवक कॉंग्रेसवाला म्हणून बोलत असे. दुर्दैवाने त्यांचे काही वर्षांपूर्वी देहावसान झाले. ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने यांचा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावर जाहीर सत्कार केला होता. आज देशात संपूर्ण श्रीराम मय वातावरण निर्माण झाले असतांना उदय तानपाठक, संजय डहाळे, मोहन बने, कै. अजित म्हात्रे अशा अनेकांची  कुणीही दखल घेतलेली नाही, याची खंत वाटते.  ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमि मंदिराचा निर्णय दिला तेव्हा मी सीएनबीसी वाहिनीवर थेट प्रक्षेपण सुरु असतांना चर्चेत सहभागी झालो होतो. यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ठणकावून सांगितलेली हिंदुत्वाची व्याख्या, “महाराष्ट्रात राहतो तो मराठी गुजरात मध्ये राहतो तो गुजराती बंगाल मध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदु आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे” ही डॉ मनोहर गजानन जोशी यांच्या निवडणूक खटल्यात मुंबई उच्च न्यायालयात मी सादर केली होती, त्यावेळी त्यांची निवड रद्द ठरविण्यात आली. पण ११ डिसेंबर १९९५ रोजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी डॉ. मनोहर जोशी यांना हिंदुत्वाच्या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. ही बाब सीएनबीसी वाहिनीवर चर्चेत स्पष्टपणे निदर्शनास आणली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. विजय वैद्य यांनी अनेक वृत्तपत्रांत यावर १२ डिसेंबर १९९५ रोजी स्तंभ लिहिले आहेत. अजय वैद्य, विलास मुकादम, प्रभाकर राणे, संजय डहाळे अशा अनेक पत्रकारांनी आपापल्या परीने यथायोग्य भूमिका निभावल्या आहेत. अपेक्षाभंगाचे दुःख नको म्हणून अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कारण शरीराला झालेली जखम बरी होऊ शकते पण मनाला झालेली जखम भरून निघत नाही. अपेक्षाभंगाचे दुःख हेच असते. याचा अर्थ राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्यांची दखल कुणी घ्यायचीच नाही असा आहे कां ? आजच्या या आनंदोत्सवात अशा या हिंदूंसाठी झटणाऱ्या, झगडणाऱ्या, रामभक्त बांधवांना केंद्र सरकारने ‘हिंदुहितरक्षक’ म्हणून गौरवान्वित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली तर ती अनाठायी ठरणार नाही. स्वतःभोवती आरत्या ओवाळून घेणारे बरेच असतात आणि ते अशा वेळी आपले उखळ पांढरे करून घेतात. जे पुढे पुढे करीत नाहीत ते दुर्लक्षित राहतात, उपेक्षित राहतात. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे ! जय श्रीराम !!     

योगेश वसंत त्रिवेदी (yogeshtrivedi55@gmail.com/ 9892935321).

आणखी वाचा