१ एप्रिल हा दिवस भारताच्या आर्थिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण याच दिवशी, १ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) स्थापना झाली. त्यामुळे हा दिवस “आरबीआय दिवस” म्हणून ओळखला जातो. देशाच्या चलनव्यवस्थेचे नियमन, बँकांचे नियंत्रण, महागाईवर नियंत्रण आणि आर्थिक स्थैर्य राखणे ही या मध्यवर्ती बँकेची प्रमुख जबाबदारी आहे.
रिझर्व्ह बँकेची स्थापना कशी झाली?
भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना प्रथम १७७१ मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज यांनी मांडली. त्यानंतर १९२६ मध्ये हिल्टन यंग आयोगाने स्वतंत्र मध्यवर्ती बँकेची शिफारस केली. या शिफारशीच्या आधारे ६ मार्च १९३४ रोजी आरबीआय कायदा मंजूर झाला आणि १ एप्रिल १९३५ रोजी बँकेची अधिकृत स्थापना झाली. सुरुवातीला मुख्यालय कोलकाता येथे होते, मात्र १९३७ मध्ये ते मुंबईत हलविण्यात आले.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑसबोर्न स्मिथ होते, तर पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी. डी. देशमुख यांनी कार्यभार सांभाळला. स्वातंत्र्यानंतर १९४९ मध्ये या बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय योगदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माते नव्हते, तर ते एक जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था, चलनप्रणाली, शेती आणि कामगार धोरण यांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या “The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution” (१९२३) या ग्रंथात भारतीय चलनप्रणालीतील त्रुटी आणि उपाय यांचे सखोल विश्लेषण केले आहे.
हिल्टन यंग आयोगाने आरबीआयची रचना करताना या ग्रंथातील विचारांचा आधार घेतल्याचे मानले जाते. आंबेडकरांनी मांडलेले विचार भारतासाठी स्वतंत्र आणि सक्षम मध्यवर्ती बँकेची गरज अधोरेखित करणारे होते.
आंबेडकरांचे दूरदृष्टीपूर्ण विचार
डॉ. आंबेडकर यांनी भारतीय शेतीतील अल्प गुंतवणूक ही उत्पादनक्षमतेतील घटाचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी कामगार धोरण, वित्तव्यवस्था आणि आर्थिक नियोजनावरही सखोल मांडणी केली. कोलंबिया आणि लंडन विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्रावर तीन महत्त्वाचे प्रबंध सादर केले, जे नंतर पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले.
रिझर्व्ह बँकेची प्रमुख कार्ये
भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. तिची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :
• चलनी नोटा जारी करणे
• केंद्र व राज्य सरकारची बँक म्हणून काम करणे
• व्यावसायिक बँकांचे नियमन करणे
• महागाई नियंत्रणासाठी मौद्रिक धोरण जाहीर करणे
• आर्थिक स्थैर्य राखणे
आंबेडकरांच्या विचारांची आजही उपयुक्तता
आजही रिझर्व्ह बँक आंबेडकरांनी सुचवलेल्या तत्त्वांवर आधारित कार्य करत आहे. देशातील आर्थिक शिस्त, चलन नियंत्रण आणि वित्तीय स्थैर्य राखण्यात या बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
समारोप
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नव्हती, तर ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा परिणाम होती. त्यामुळे १ एप्रिल हा दिवस केवळ “आरबीआय दिवस” नसून भारताच्या आर्थिक सक्षमीकरणाचा स्मरणदिन आहे.
— जयश्री कल्पना अशोक साळुंखे
अधिव्याख्याता, संगणक अभियांत्रिकी
शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे
संपर्क : ८५५१०६६९७५








