नाशिक, दि. २० : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत असून, नव्या खुलाशांनी राज्यभरात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनुसार, खरात हा तथाकथित ‘ओशनो जल’ तयार करून त्यात औषध मिसळत असे आणि हे जल मिळवण्यासाठी काही राजकीय व्यक्तींकडून विशेष मागणी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दमानिया यांनी आरोप केला की, कफ सिरपमध्ये पाणी मिसळून त्यात औषध कुटून टाकून हे ‘ओशनो जल’ तयार केले जात असे. हे जल मिळवण्यासाठी काही प्रभावशाली व्यक्ती गाड्या किंवा इतर माध्यमे पाठवत असल्याचेही त्यांनी म्हटले. या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग असू शकतो, असा संशय व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा उशिरा का घेतला गेला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, अशोक खरातवर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. मंत्र-तंत्राच्या नावाखाली महिलांना फसवून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर असून, पोलिस तपासात त्याचे विस्तृत जाळे उघड होत आहे.
तपासात आणखी एक मोठा खुलासा समोर आला असून, खरातने सुमारे २०० कोटी रुपयांहून अधिक बेनामी संपत्ती उभारल्याचे समोर आले आहे. नाशिक, शिर्डी, सिन्नर आणि पाथर्डी परिसरात त्याच्या व कुटुंबीयांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन व मालमत्ता आढळली आहे. पाथर्डी भागातच सुमारे १५० कोटी रुपये किमतीची ३० एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे. विविध नातेवाईकांच्या नावावर ५० एकरांहून अधिक जमीन असल्याचेही प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
याच प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारा नीरज जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खरातच्या कार्यालयात काम करणाऱ्या जाधवने सीसीटीव्ही फुटेज मिळवून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून पुढील चौकशीत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.








