ऑक्टोबर १९९० विश्व हिंदू परिषदेने शांततेच्या मार्गाने “श्री राम जन्मभूमी अभियान” छेडले होते. या आंदोलनाची तयारी करतांना राजापूर पूर्व विभागातून कोणकोण जाऊ शकतील, चाचपणी सुरु झाली. पाचल माध्यमिक शाळेत आमचे गुरुवर्य श्री. द. वि. ठाकूरदेसाई आणि श्री. वझे सर आरएसएस आणि संघ परिवारातील विषयांत नेहमीच अग्रेसर असत. त्याच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी माझे नाव दिले. मनांत फक्त प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन त्यांचे दर्शन घेता येईल इतकेच होते. रामायण कथा वाचनांतून श्री राम हा आदर्श पुरुष असल्यामुळे नि:संदेह मी तयार झालो, अशा जाणाऱ्या स्वयंसेवकांना ‘कारसेवक‘ असे म्हटले जायचे.
राजापूर तालुक्यातून सुमारे २५ ते ३० कारसेवक निघणार होते. तारीख ठरली आणि पुढे सर्व तालुक्यातील कारसेवकांनी १५ दिवसांचे कपडे, अंथरून-पांघरून, शाल-स्वेटर, टिकाऊ खाद्यपदार्थ इ. आवश्यक सामानासह रत्नागिरी येथे जमावे असे ठरले. त्याप्रमाणे तत्कालीन आमदार श्री शिवाजीराव गोताड आणि गुहागरचे आमदार मा. श्री. श्रीधर(तात्यासाहेब) नातू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबई गाठली आणि तेथून रेल्वेने अयोध्येकडे रवाना झालो. महाराष्ट्र-मध्यप्रदेश मागे टाकून गाडी उत्तरप्रदेशांत धावू लागली आणि चलबिचल सुरु झाली. उत्तरप्रदेश मधे तेव्हा जनता दलाचे नेते श्री. मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होते.
विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनानंतर देशभरातून लक्षावधी रामभक्त येणार हे उत्तर प्रदेश सरकार जाणून होते. त्या कारसेवकांना जागोजागी रोखून धरावे आणि अयोध्येत पोहोचू द्यायचे नाही असे तेथील प्रशासनास आदेश होते. संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानुसार आम्हालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘प्रतापगढ’ रेल्वे स्टेशनवरून खाली उतरण्यास भाग पाडले. पण हे सर्वत्र असेच घडत असल्यामुळे आम्हाला तेथील स्थानिक कारसेवकांनी विश्वासात घेऊन यापुढे आम्हाला अयोध्येपर्यंत सुमारे १३०-१४० किलोमीटर पायीच जावे लागले. तेही आडवळणातून, शेतातून, नदी-नाल्यातून, चिखलातून, बांधावरून ते कारसेवक पुढे-पुढे नेत असत.
जाताना वाटेत अर्थातच रामभक्त हिंदूंच्या जवळ-जवळ प्रत्येक घरात खाटा टाकलेल्या असत, चहा-पाणी, नाश्ता अन्य खाद्यपदार्थ, फळफळावळ, जेवणाची वेळ असेल तर पोटभर जेवण. जाती-पातीचा कसलाही विचार न करता केवळ रामभक्त आहेत त्यांची सेवा करण्यात धन्यता मानत होते. कशाशीच वानवा नव्हती, अत्यंत प्रेमाने पाहुणचार होत होता. सुमारे अडीच- तीन दिवस रोज १०-१२ तास चालणे होत असे. पहिला दिवस उत्साहात गेला. गोमती पार केल्यानंतर मात्र पायाला फोड आलेले, बूट घालून चालणे हे वेदनादायक होत होते. पण “जय श्रीराम” च्या घोषणा ऐकल्या कि पुढे पुन्हा उत्साहाने वाट चालायची; सगळी शक्ती एकवटून प्रभू रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी सगळा क्षीण विसरत सगळे कारसेवक पवित्र शरयू नदीचे विस्तीर्ण पात्र होडीने पार करत अखेर अयोघ्येत पोहोचले. अयोध्यानगरी शब्दश: तशीच आहे जिकडे तिकडे पहावे तिकडे मंदिरेच मंदिरे, आमची सोय रामजन्मभूमी पासून अलीकडे ४०० मीटरवर वाल्मिकी भवनात केली होती.
अखेर ३० ऑक्टोबरला सकाळी दहा – साडेदहाच्या सुमारास बॅरिकेट तोडून चार-पाच हजार कारसेवक बाबरी मशीदीवर चढून त्यांनी भगवा फडकविला. “ याजसाठी केला होता अट्टाहास !“ अशी बातमी मिळाली. आम्ही थोडे दूर होतो पुढे जाणे शक्य नव्हते पन्नास हजार पोलिसांनी ताबा घेतला होता. पण दुर्दैवाने त्यादिवशी कारसेवकांवर बेछूट गोळीबार झाला आणि अनेक कारसेवक शहीद झाले. त्यामुळे तेथील वातावरण हिंसक बनले. ते शांत करण्यासाठी प्रशासनाकडून आमची रवानगी फैजाबाद रेल्वे स्टेशनवर केली आणि तिथूनच आम्ही मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करीत दोन दिवसांनी आम्ही सगळे आपआपल्या घरी पोहोचलो. अत्यंत विमनस्क परिस्थितीत घडलेली हि यात्रा अपूर्णच राहिली. पण येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या अभूतपूर्व कार्यक्रमाचे साक्षीदार आपण होऊया आणि अयोध्येतील रामजन्मभूमीवरील अतीभ्यव श्रीराममंदिराचे यथावकाश दर्शन घेऊया. अखेर सुमारे पाचशे वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला.
धन्यवाद !

लेखक- श्री. सुहास रंगनाथ सप्रे पाचल, मु.पो. तळवडे (पाचल), ता-राजापूर,जि-रत्नागिरी








