बाळ माने यांचे रत्नागितील जल्लोषात स्वागत

रत्नागिरी, दि. २४ (प्रतिनिधी) :
जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, उद्धवसाहेब, बाळ माने आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बाळ माने यांचे जल्लोषात स्वागत केले. रेल्वे स्थानक आणि साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखा क्र. १ येथे फटाके वाजवून आणि घोषणात देत उत्साहात स्वागत केले.

भाजपाला राम राम करत बाळ माने यांनी काल मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवबंधन बांधले. याप्रसंगी माने कुटुंबीय व शिवसेना नेते उपस्थित होते. बाळ माने १२.३० च्या सुमारासा रत्नागिरी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. त्यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फलाटावर रेल्वे थांबल्यानंतर अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर स्थानकातून वर आल्यानंतर शिवसैनिकांनी उत्साहात घोषणा दिल्या.

या वेळी रेल्वेस्थानकावर शिवसैनिकांची गर्दी झाली होती. शिवेसना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे, प्रशांत साळुंखे, सौ. बामणे,
बाबू मयेकर, सलील डाफळे, जकी खान, संजय पावसकर, राजश्री शिवलकर, बिपीन शिवलकर आदींसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. १ येथे पत्रकारांशी संवाद साधताना बाळ माने यांनी सांगितले की, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवार यांचे आभार मानतो. त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला निवडले. याशिवाय माझे जुने सहकारी मित्र बंड्या साळवी, प्रमोद शेरे, प्रशांत साळुंखे, राजन सुर्वे तसेच सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उदय बने यांनीही मला सहकार्य केले आहे. उद्धव ठाकरे, सचिव विनायक राऊत, भास्कर जाधव यांनी माझ्यावर रत्नागिरीची जबाबदारी टाकली आहे.

उद्धवसाहेबांशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणार
रत्नागिरीत ज्यांनी उद्धवसाहेबांशी गद्दारी केली, हिंदुहृदयसम्राटांशी बेईमानी केली, त्या गद्दारांना गाडण्याचा संकल्प आज जनतेच्या सहकार्याने करतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनलमध्ये गद्दारांच्या विरोधात जनतेने कौल दिला आहे. महाविकास आघाडीतून विनायक राऊत यांना ८५ हजार मते मिळाली आणि राणे यांना ७५ हजार मते मिळाली. म्हणजे रत्नागिरीकरांनी बदलाचा कौल दिला. आता ही विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलिकडे जाऊन रत्नागिरीकर परिवर्तनासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे मी ऐतिहासिक विजय मिळवणार.

उदय बने यांच्या नाराजीबद्दल विचारले असते बाळ माने म्हणाले की, उदय बने हे माझे अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. १९९७ मध्ये ते प्रथम निवडून आले. त्यावेळी त्यांना सहकार्य केले होते. २०१२ मध्ये सुद्धा त्यांना पाली जि. प. गटातून निवडून आणले होते. त्यांनी जि. प. सभापती, अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते हाडाचे शिवसैनिक आहेत. ते माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली. मला उद्धव साहेबांनी शिवसेनेत येण्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी मी उदय बने यांना म्हटले की, आपण तालुक्याचा सर्वे करा. कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या. विभागप्रमुख, सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करा. जर माझ्या नावाला होकार मिळाला तर मी उभा राहीन. किंवा तुमच्या नावाला होकार असेल तर मी मदत करेन. उद्धवसाहेब घेतील तो निर्णय मान्य करूया व कोणाचेही नाव असले तरी एकमेकांना सहकार्य करूया. परंतु ते नाराज असल्याचे समजले. मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. आता भेट घेणार आहे. मी येत्या सोमवारी (ता. २८) सकाळी १० ते १२ या वेळेत महाविकास आघाडीच्या सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक अर्ज भरणार आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा