मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) : भाऊबीजेच्या सणाला सर्वत्र बहिणी भावांना ओवाळत भावबंधाचा उत्सव साजरा करत असतात. मात्र नालासोपारा मोरेगाव व ठाण्यातील मोहिते कुटुंबाने गेली तब्बल ३५ वर्षे एकत्रितपणे भाऊबीज साजरी करण्याची परंपरा जोपासली आहे. समाजसेवक विनेश भाऊ मोहिते, आकाश मोहिते आणि आदित्य मोहिते या तीन भावांना त्यांच्या बहिणी सुचिता, पूनम, रेश्मा आणि आर्या यांनी या वर्षीही प्रेमाने ओवाळून त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा केला.
आईनंतर जर कोणी मनापासून काळजी घेणारे, प्रत्येक सवयी-आवडी ओळखणारे असतील तर ती म्हणजे बहीण—असं या कुटुंबाचं मत आहे. “भाऊ हे बहिणीच्या जगातील पहिलं आणि कायमचं रक्षण कवच असतात,” असं सुचिता ताईने सांगितलं. या वर्षी छोट्या बहिण-भावाने — तनुज आणि कस्तुरीने —ही या पारंपरिक ओवाळणीसोहळ्यात सहभाग घेतला आणि वातावरण अधिकच उत्सवी केलं.
भाऊबीजेच्या निमित्ताने मोहिते कुटुंबाने प्रेम, स्नेह आणि एकोप्याचा हा संदेश समाजासमोर ठेवला आहे. नात्यांतील आपुलकी, ओवाळणीतील स्नेह, आणि एकत्रित सण साजरा करण्याची ही सुंदर परंपरा अनेक कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.