भारतीय जनता पार्टीच्या ‘रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष’पदी प्रशांत यादव यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा; ना. नितेश राणे यांच्याकडून शुभेच्छा

रत्नागिरी, दि. १९ (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या ‘रत्नागिरी दक्षिण जिल्हा अध्यक्ष’पदी चिपळूणचे श्री. प्रशांत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.

नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आज झालेल्या या नियुक्तीमुळे रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रशांत यादव यांची संघटनात्मक कामगिरी, पक्षाशी असलेली निष्ठा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या निवडीचे स्वागत करत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वरून प्रशांत यादव यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ना. नितेश राणे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,
“प्रशांत यादव यांची ही नियुक्ती पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी तसेच रत्नागिरी ग्रामीण भागातील विकासासाठी टाकलेले अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक गतिमान, प्रभावी आणि तळागाळापर्यंत पोहोचेल, असा मला ठाम विश्वास आहे.”

प्रशांत यादव यांच्या नियुक्तीनंतर रत्नागिरी दक्षिण विभागातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून, जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती भाजपसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

आणखी वाचा