रत्नागिरी, दि. ११ (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये महायुतीचा महाविजय होण्यासाठी आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा शिवसेना-महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचंड विजयासाठी भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी (द.) हा प्रचारात सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे.
रत्नागिरी मंडलात भाजपा महिला मोर्चा पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरला असून नुकत्याच नाचणे जि. प. गट येथील रत्नागिरी दक्षिण मंडल अध्यक्षा सौ. प्रियल जोशी, करबुडे जि. प. गटात भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, वाटद जि. प. गटातील ग्रा. पं. नांदीवडे सरपंच सौ. आर्या गडदे यांच्या निवासस्थानी महिला पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका संपन्न झाल्या.
भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, रत्नागिरी (द.) महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे आणि सोशल मिडिया जिल्हा संयोजिका वर्षा राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात, रत्नागिरी मंडल, जि. प. गटामधील महिला पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिला-भगिनींसोबत बैठका घेऊन प्रचार यंत्रणा राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या विजयासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या जनकल्याण योजनांचे जनसामान्यांना होणारे लाभ, महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारचे महत्त्व इ. मुद्द्यांवर प्रचार करावा तसेच सोशल मिडियाचा प्रभावी उपयोग करावा अशा सूचना दिल्या.
‘महायुती – एक परिवार’ असे एकत्र प्रचार कार्यातून दर्शवून विरोधकांचे खोटे मनसुबे उधळून लावणे कसे गरजेचे आहे यावर चर्चा झाली.
सर्व महिला-भगिनींनी ‘विजय आपलाच, गुलाल आपलाच’ हे सत्यात उतवरण्यासाठी शत प्रतिशत योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.