सांगली, दि. ०९ (प्रतिनिधी): राज्यात निवडणुकीची वातावरण असताना सांगलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीतील मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडेंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सध्या खाडे भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते. या घटनेनंतर सांगलीतील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार मिरज-पंढरपूर रस्त्यावर सुधाकर खाडे यांच्यावर खुनी हल्ला झाला. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणाशी निगडित पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला.
कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडे यांना जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेबाबत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.








