NCP नेते बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या

मुंबई, दि. १२ (वृत्तसंस्था): राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेर गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांच्या छातीवर गोळी लागल्याची माहिती आहे.
वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ गोळीबार झाला. रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. पुढील तपास सुरू आहे.
SRA प्रकल्पाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. बांद्र्यातील निर्मलनगर परिसरात फटाके वाजत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी सिद्दीकी यांच्या सहकाऱ्यालाही पायाला गोळी लागली आहे. १५ दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती कळताच अभिनेता संजय दत्त लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दिकी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. या हल्ल्यात एक गोळी त्यांच्या सहकाऱ्यालाही पायाला लागली. यानंतर या दोघांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, बाबा सिद्दिकींचा मृत्यू झाल्याचं आता लीलावती रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असं आता सांगितलं जात आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
बाबा सिद्दिकींवरील गोळीबारासंदर्भात मुंबई पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, बाबा सिद्दिकींवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडण्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भातला पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असल्याची माहितीही पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.
हरियाणा-उत्तर प्रदेशचं कनेक्शन?
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून त्यात ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोरांबाबत त्यांनी माहिती दिली आहे. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी हरियाणाचा आणि दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा असल्याचं समोर आलं आहे. त्याशिवाय, तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे उत्तर भारतातील मोठ्या गँगचा हात असल्याचा संशय आता यातून व्यक्त होऊ लागला आहे.
कोण आहेत बाबा सिद्दीकी?
– माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, दत्त कुटुंबियांचे निकटवर्तीय
– फेब्रुवारी 2024 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) सहभागी
– बांद्रा मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केलं
– सलमान खान, शाहरुख खान यांचे निकटवर्तीय

आणखी वाचा