चिपळूण, दि. १७ : तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी उसळली. नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी १३ उमेदवार, तर २८ नगरसेवक जागांसाठी १४१ असे एकूण १५४ अर्ज दाखल झाले आहेत.
भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) तसेच अपक्षांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. मात्र शेवटच्या दिवशीही महायुती आणि महाविकास आघाडीचे चित्र स्पष्ट झाले नाही. शिवसेना–भाजप युतीबाबत चर्चा सुरू असली तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्याने आघाडी फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी नगराध्यक्षासह अनुक्रमे १६ आणि १५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळते. तर शिवसेना (उबाठा) गटाने नगराध्यक्षासह सर्व २८ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अपक्षांनाही यंदा मोठी उत्सुकता असून अनेकांनी आपले नशीब आजमावले आहे.
सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या एका घडामोडीत, शिवसेना शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी अचानक पत्नीसमवेत कॉंग्रेसमार्फत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठे राजकीय समीकरण बदलले आहे. महायुतीच्या आतमध्येही उमेदवारी आणि जागावाटपावरून तणाव वाढल्याचे संकेत आहेत.
“वेट अँड वॉचची भूमिका” — आमदार शेखर निकम
महायुती व्हावी यासाठी चर्चेत ‘९–९–१०’ फार्म्युला ठरत होता, परंतु दोन जागांवर मतभेद कायम असल्याचे आमदार शेखर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या आपण ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाला धक्का : उपशहरप्रमुख शेखर व आरती महाडिक यांचा उबाठात प्रवेश
चिपळूणमधील राजकीय वातावरण आणखी तापवणारी घटना म्हणजे शिवसेना (शिंदे गट) चे उपशहरप्रमुख शेखर महाडिक आणि आरती महाडिक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले.
भाजपमध्येही नाराजी; परिमल भोसले यांचा राजीनामा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतही अंतर्गत नाराजी उफाळली आहे. नारायण व निलेश राणे यांचे समर्थक परिमल भोसले यांनी उमेदवारी प्रक्रियेतील अन्याय आणि ठाकरे गटातून आलेल्या शशिकांत मोदी यांना दिलेल्या संधीविरोधात राजीनामा दिला. त्यांनी मोदी यांच्यावर आरोप करत त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून राणे विरुद्ध चव्हाण गटातील दरी वाढण्याची चिन्हे राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. आधीच नुपूर बाचीम आणि विनोद कदम यांनीही राजीनामा दिला आहे. पक्षश्रेष्ठी या नाराजीचा गांभीर्याने विचार करतात की दुर्लक्ष करतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.








