चिपळुणातील बहुसंख्य रिपब्लिकन कार्यकर्त्यांचां प्रशांत यादव यांना पाठिंबा ; कार्यकर्त्यांनी बैठकीत केला निर्धार

 चिपळूण, दि. ३० (प्रतिनिधी): सध्या अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा आणण्याचे प्रयत्न सुरु असून आरक्षण संपविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे संविधान विरोधी शक्ती रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना जाहीर पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय चिपळुणातील रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला असून गावागावात झोकून काम करीत श्री. प्रशांत यादव यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रिपब्लिकन कार्यकर्ते मनोहर मोहिते, सुभाष मोहिते, संजय गमरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२८) रिपब्लिकन पक्षाच्या चिपळुणातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.     यावेळी केवळ रस्ते, पाणीसह मुलभूत सुविधा म्हणजे विकास नसून सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला तसेच चळवळीशी बांधिलकी जपणाऱ्या एकनिष्ठ उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. दूरदृष्टी असलेले श्री. प्रशांत यादव यांनी आज वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्ट प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो शेतकर्‍यांना रोजगार दिला असून कृषिसह विविध क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन त्यांनी ठेवले आहे. केवळ जवळचे कार्यकर्ते, नातेवाईक, हितचिंतक यांचाच विचार न करता तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला रोजगार मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या श्री. प्रशांत यादव यांच्या पाठिशी ठाम उभे राहाण्याचा निर्धार या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे चिपळुणातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी उपस्थित चिपळूण नागरी पतसंस्थेच्या
मुख्य प्रवर्तक, श्री.प्रशांत यादव यांच्या पत्नी सौ. स्वप्ना यादव यांनी सर्वांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून पुढील निवडणुकीत देखिल आपण श्री.प्रशांत यादव यांचाच विचार कराल असे परिवर्तन घडवू असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण शहरप्रमुख शशिकांत मोदी, काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी ही निवडणूक व्यक्ती विरोधात नसून विचारांच्या विरोधात आहे असे सांगतानाच आज महागाईने उच्चांक गाठला आहे.जीएसटीच्या नावाखाली लुटमार सुरु असून ती रोखण्यासाठी श्री. प्रशांत यादव यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केले.
चिपळूणचा आमदार मुस्लीम, बौद्ध बांधव ठरविणार
कोणता समाज कोणाकडे हे सध्या कोणी गृहीत धरू नये. येथील मुस्लीम आणि बौद्ध समाजबांधव विचारवंत असून त्यांना आपला हितचिंतक ओळखता येते.  ज्यांना संधी दिली त्यांना पदावरुन खाली खेचण्याचा अधिकार देखिल आम्हाला आहे. त्यामुळे आता अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असून चिपळूणचा आमदार मुस्लीम, बौद्ध बांधव ठरविणार, असल्याचा विश्वास शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टी पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना उबाठा पक्षाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी, संतोष मोहिते, महेंद्र कदम, रमण मोहिते, संदेश कदम, जयराम मोहिते, मिलींद कदम, संजय सावंत, लक्ष्मण कदम, दीपक कांबळे, काळूराम सकपाळ, प्रफुल्ल जाधव, रवींद्र कांबळे, प्रमोद मोहिते, विपुल कदम, संतोष मोहिते ,संदेश गमरे, रवी जाधव, धनाजी जाधव,रमण मोहिते,प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.आरपीआय पक्षाचे माजी सरचिटणीस संजय गमरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आणखी वाचा