चिपळूण, दि. २२ : कोकणातील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले असून, ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी खुली ऑफर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत विकासाच्या राजकारणासाठी भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमोद जठार आणि भास्कर जाधव एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमानंतर जठार म्हणाले, “भास्कर जाधव हे कोकणातील अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जोडलेले नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या आणि विशेषतः कोकणच्या विकासासाठी अधिक प्रभावी उपयोग होऊ शकतो. त्यांनी भाजपमध्ये येऊन विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे.”
प्रमोद जठार यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर आता जठार यांनी सार्वजनिकरित्या भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
यावेळी जठार यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनावरही भूमिका मांडली. आंदोलनात काही विघातक आणि देशविरोधी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घुसखोरी केल्याचा आरोप करत, अशा घटकांवर केंद्र सरकार कठोर कारवाई करेल आणि देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार या प्रकरणात कठोर कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमोद जठार यांनी विरोधकांवरही टीका करत, राज्यात आणि देशात विरोधी पक्षांकडे प्रभावी नेतृत्व नसल्याचा दावा केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनांमुळे काँग्रेसचेच राजकीय नुकसान होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, भाजपकडून सातत्याने मिळणाऱ्या या सकारात्मक संकेतांवर ठाकरे शिवसेना किंवा आमदार भास्कर जाधव यांची भूमिका काय असेल, याकडे आता कोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








