चिपळूण, दि. २९ (प्रतिनिधी) : प. ए. सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय, चिपळूण येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे गुरुजनांविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका संगीता नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, परशुराम पूजन, सरस्वती पूजन आणि ग्रंथपूजनाने झाली. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सिद्धी ठसाळे, प्राची गगनग्रास, शर्मिला मोडक यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रास्ताविकानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. आरोही करांडे आणि सुरभी शेंबेकर यांनी मनोगत व्यक्त करून गुरुंबद्दलचा आदर व्यक्त केला. श्लोक रोकडे याने ‘गुरूविण नाही दुजा आधार’ तर आरुष इंगळे याने ‘रात्रंदिवसा देवा तुझी मूर्ती ध्यानात’ हे भक्तिगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
शिक्षिका शितल पालांडे यांनी धौम्य ऋषी आणि बाळ अरुणी यांची कथा सांगून गुरुभक्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मुख्याध्यापिका संगीता नाईक यांनीही गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत कृतज्ञता व्यक्त केली. हा भावनिक क्षण उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चांदणे यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त बालसभेचे आयोजन तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धाही घेण्यात आली. गुरु-शिष्य परंपरेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.







